Eknath Shinde : माझा आवाज असा बंद करु नका, तसा तो बंद होणार नाही, कारण माझ्या सोबत शिवसैनिक : एकनाथ शिंदे
लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही निलम ताई सांगतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कोल्हापूर : बाळासाहेब कोणा एकट्याचे नव्हते,ते शिवसैनिकांचे दैवत होते. यांना पक्ष प्रमुखांचा मोह 2004 पासून होता यांचे अनेक साक्षीदार आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोल्हापुरात महाधिवेशन समारोपात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं
ते म्हणाले की, शरद पवार म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हे मला ते सांगत होते तेव्हा रडवेला चेहरा होता. तेव्हा जाणवले यांना मोह झाला आहे. मी कधीच पदाला हापापलो नव्हतो, त्यांनी मला आधीच सांगितले असते तर मी तसा माहोल तयार केला असता. ते दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत, एक चेहरे पे कई चेहरे लोग लगाते है लोग. माझा आवाज असा बंद करु नका तसा तो बंद होणार नाही कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत. लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही निलम ताई सांगतील. मविआसोबत दिल्लीला गेले होते मोदींना भेटायला तेव्हा एकटेच गेले. केबिनमध्ये मोदींना भेटायला गेले आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे डरपोक नाही, हा निधड्या छातीचा चेला
दरम्यान, जय श्रीराम म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवात केली. लवकरच आपण सर्व अयोध्येला जायचं आहे. या महाअधिवेशनामुळे कोल्हापुरात भगवं वादळ आलं आहे. शिवसैनिकांचे शक्तीपीठ या अधिवेशनाच्या निमित्ताने अवतरलं आहे. अंबाबाईचे दर्शन घेवूनच बाळासाहेब सभेला सुरुवात करायचे आपणही तेच केले. बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेवुन जातोय म्हणून ही आज शिवसेना आहे. या अधिवेशनामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. एकनाथ शिंदे डरपोक नाही, हा निधड्या छातीचा चेला असल्याचे म्हणाले.
या अधिवेशनात अनेक ठराव घेतले. पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या अभिनंदनाचे ठराव मांडले. किती तरी आमदार शिवसेनेत आले आहेत. तसेच हजारो लोकं येत आहेत. कोणी इकडे आले की गद्दार आणि कचरा. हेच शिवसैनिक कचऱ्यात तुम्हाला जमा करतील. मी मुख्यमंत्री झालो शिवसेना आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने. आज आत्मपरीक्षण आत्मचिंतन कोणी केले पाहिजे? मी जिथे जिथे जातो तिथे लोकं का ? उशीरा उशीरा पर्यंत थांबतात. हे प्रेम आपुलकी पैसे देवून मिळवता येत नाही. हे कामातून, वागण्यातून मिळत असते आणि म्हणू आज पक्ष वाढतोय पुढे जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या