Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
पुढील पाच वर्षांत जीएसटीच्या परताव्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच जीएसटीचा आवश्यक तो परतावा इचलकरंजीकरांना मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजीच पाणीप्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नसल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महानगरपालिकेच्या कोट्यवधीचा जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासनही दिले. इचलकरंजी शहरात अंदाजित 430 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सुमारे 430 कोटी रुपये खर्च करून इचलकरंजी शहरातील महानगरपालिका क्षेत्रात 10 तर 5 ग्रामीण भागात विकासकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पंचगंगा प्रदूषण उपाययोजनेअंतर्गत औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी (मनपा व एमआयडीसी क्षेत्र) 361.31 कोटी, ग्रामीण भागात (जिल्हा परिषद) 5.75 कोटी, तर शहरात 62.77 कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिमोटद्वारे केले.
जीएसटी परतावा मिळणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुढील पाच वर्षांत जीएसटीच्या परताव्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच जीएसटीचा आवश्यक तो परतावा इचलकरंजीकरांना मिळेल. शहराच्या विकासाकरिता आणि येथील उद्योगांसाठी योग्य ती कार्यवाही करून इचलकरंजी शहराचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘श्री शंभूतीर्थ’ पुतळ्याचे लोकार्पण
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कॉ. के. एल. मलाबादे चौक सुशोभीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ‘श्री शंभूतीर्थ’ म्हणून लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महानगरपालिकेसह येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून हा पुतळा उभारला आहे. यातील जनसहभाग महत्त्वाचा असून, हे एका अर्थाने जनतेचे स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने लोकांमध्ये तेज निर्माण होते. महाराजांचा इतिहास देदिप्यमान असून, तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या सोहळ्यासाठी संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी इचलकरंजी येथील हेलिपॅडवर आमदार डॉ. राहूल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
इतर महत्वाच्या बातम्या
























