Kolhapur Football : साऱ्या दुनियेची शान म्हणत कोल्हापूरच्या तरूणांचा 'कतार'मध्ये छत्रपती शिवराय आणि लोकराजा राजर्षी शाहूंचा जयघोष
कतारमध्ये फुटबाॅल वर्ल्डकप (Fifa World Cup) सुरु झाल्यापासून फुटबाॅल पंढरी कोल्हापुरातील मंडळ आणि तालीम यांची ईर्ष्या चांगलीच दिसून येत आहे. अगदी गल्लीमध्ये पताका सुद्धा लावण्यात आल्या आहेत.
Kolhapur Football : कतारमध्ये फुटबाॅल वर्ल्डकप (Fifa World Cup) सुरु झाल्यापासून फुटबाॅल पंढरी कोल्हापुरातील मंडळ आणि तालीम यांची ईर्ष्या चांगलीच दिसून येत आहे. संघ आणि खेळाडूंना समर्थन देण्यासाठी कोल्हापूर शहरातील एक कोपरा किंवा चौक शिल्लक राहिलेला नाही ज्या ठिकाणी पोस्टर्स किंवा कटआऊट्स लागलेले नाहीत. अगदी गल्लीमध्ये पताका सुद्धा लावण्यात आल्या आहेत.
हे सर्व सुरु असतानाच आपल्या तालमीचा झेंडा कतारच्या मैदानात नेऊन झळकवण्याचा पराक्रमही फुटबाॅल पंढरीतील (Kolhapur Football) फुटबाॅल वेड्यांनी केला आहे. कोल्हापूर शहरातील शिखर संस्था असलेली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचा झेंडाही कतारमध्ये झळकला. आताही तसाच प्रकार घडला आहे. मात्र, यावेळी कोणत्या तालमीचा झेंडा फडकला नसून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचा जयघोष कतारमध्ये झाला आहे.
कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध बेकरी असलेल्या माधुरी बेकरीचे मालक असलेल्या वडगावकर कुटुंबातील श्रीदत्त चंद्रकांत वडगावकर, प्रसन्न रतिकांत वडगावकर, प्रेम रतिकांत वडगावकर आणि अक्षय सुनील मोरे यांनी साऱ्या दुनियेची शान म्हणत शिवशाहूंचा जयघोष कतारमध्ये केला. त्यांनी अथक प्रयत्नातून व्हिसा, तिकीटे मिळवून त्यांनी 25 नोव्हेंबर कतार गाठले. कतारमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी आवडत्या संघांचा सामना पाहण्याचा आनंद लुटलाच, पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा असलेले फ्लेक्स झळकावले. साऱ्या दुनियेची शान आमचे राजे असा मजकूर सोबत भारताचा झेंडा असा आगळेवेगळे छत्रपतींवरील प्रेम कतारमध्ये दर्शवले.
कोल्हापुरातील फुटबॉल प्रेम सर्वज्ञात आहे. या फुटबॉल प्रेमापोटीच येथील काही तरूण मंडळींनी 4 वर्षांपूर्वी कतारला फिफा वर्ल्ड कप बघायला जाण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी घरातचं पिग्मी सुरू केली होती. त्यासाठी दररोज, आठवड्याला, महिन्यातून पैसे वाचवणे सुरू झाले होते.
संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची पात्रता फेरी कोल्हापुरात
दुसरीकडे कोल्हापूरचा फुटबाॅल (Kolhapur Football) हंगाम लांबणीवर पडला असला, तरी राष्ट्रीय पातळीवरील सामने पाहण्यासाठी संधी लाभणार आहे. देशातील संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (santosh trophy 2022) पात्रता फेरी प्रथमच कोल्हापूरमध्ये होणार आहे. 7 ते 15 जानेवारीला ‘ड’ गटाचे विभागीय सामने कोल्हापुरात होणार आहेत. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन याचे संयोजन करणार आहे. याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घोषणा केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या