Ambabai Mandir Navratri : अंबाबाई मंदिरात गर्दीचा महापूर; पहिल्या तीन दिवसांमध्येच तीन लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन
Ambabai Mandir Navratri : कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत चालली आहे.
Ambabai Mandir Navratri : कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत चालली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी सोमवारी नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून बुधवारपर्यंत तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.
पहिल्या माळेपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी सुरु
काल बुधवारी 1 लाख 49 हजार 580 भाविकांनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले. मंगळवारी 1 लाख 44 हजार 921 भाविक आले होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अधिकाऱ्यांना 5 ऑक्टोबरला दसऱ्यापर्यंत सुमारे 25 लाख भाविक मंदिरात भेट देतील अशी अपेक्षा आहे. साधारणपणे नवरात्रीच्या पाचव्या माळेनंतर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत जाते असा अनुभव आहे. मात्र, यावेळी पहिल्या माळेपासून भाविकांची पावले अंबाबाईच्या दर्शनासाठी पडू लागली आहेत.
पर्यटकांची वर्दळ वाढल्याने हॉटेल्स, वसतिगृहे, यात्री निवास आणि निवासस्थानेही पूर्णपणे व्यापली आहेत. सणासुदीच्या काळात या सुविधांचे दरही वाढले आहेत. तिसऱ्या माळेला देवीची सिद्धीदात्री रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती. पुजारी आशुतोष कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली.
तिसऱ्या माळेला सिद्धीदेवी रुपातील अलंकार पूजा
श्री दुर्गादेवीच्या नऊ अवतारांपैकी (नवदुर्गा) नववा अवतार म्हणजे सिध्दीदात्री. देव, दानव, मानव आदिंना सिध्दी प्रदान करणारी देवी म्हणजे सिध्दिदात्री. सिध्दी म्हणजे असामान्य क्षमता. मार्कण्डेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्त्व आणि वशित्त्व ह्या आठ सिध्दी आहेत. ब्रह्मवैवर्त्तपुराणानुसार ह्या आठ धरुन एकूण अठरा सिध्दी आहेत.
दरम्यान, उत्सवाच्या पाचव्या दिवशी अंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवर येणार असल्याने ललित-पंचमीची टेंबलाई टेकडीवर तयारी जोरात सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी-रत्नागिरी येथील प्रसिद्ध जोतिबाच्या मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या