Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District Assembly Constituency) मतदानानंतर आकडेमोड होत असतानाच निकालासाठी अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी उद्या शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
मतमोजणीसाठी कशी असणार यंत्रणा?
जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीसाठी 176 मोजणी पर्यवेक्षक, 186 मोजणी सहाय्यक, 196 सूक्ष्म निरीक्षक आणि पोस्टल मतपत्रिका मतमोजणीसाठी 154 मोजणी पर्यवेक्षक, 308 मोजणी सहाय्यक, 154 सूक्ष्म निरीक्षक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
पहिला निकाल इचलकरंजीचा येणार
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात पहिल्यांदा गुलाल उधळला जाणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 फेऱ्यांमध्येच मतमोजणी पार पडणार आहे. मात्र, राधानगरी विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक 31 फेरी असल्याने सर्वात शेवटी निकाल राधानगरी विधानसभेचा असणार आहे. चंदगड मतदारसंघांमध्ये 28 फेरी असतील. करवीर मतदारसंघांमध्ये 26 फेऱ्या असतील. कागल मतदारसंघांमध्ये 26 फेऱ्या असतील. शाहूवाडी मतदारसंघात 25 फेऱ्या असतील. हातकणंगले मतदारसंघात 24 फेऱ्या आहेत. कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांमध्ये 23 फेऱ्या आहेत. शिरोळ मतदारसंघामध्ये 22 फेऱ्या आहेत. राधानगरीचा निकाल शेवटी लागणार असून इचलकरंजी निकाल लागताच शिरोळ आणि त्यानंतर कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर एकत्रित निकाल येण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार
- चंदगड : पॅव्हेलियन हॉल गांधीनगर, नगरपरिषद, गडहिंग्लज
- राधानगरी : तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी
- कागल : जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल
- कोल्हापूर दक्षिण : व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी, कोल्हापूर
- करवीर : शासकीय धान्य गोदाम क्र. D, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर
- कोल्हापूर उत्तर : शासकीय धान्य गोदाम क्र. A, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर
- शाहूवाडी : जुने शासकीय धान्य गोदाम-पश्चिमेकडील बाजू भाग-ब, तहसिल कार्यालयाशेजारी, शाहूवाडी
- हातकणंगले : शासकीय धान्य गोदाम- नंबर 2, हातकणंगले.
- इचलकरंजी : राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केटसमोर, इचलकरंजी
- शिरोळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील आवारामध्ये (तळ मजला)
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे
- चंदगड – 74.61 टक्के
- राधानगरी – 78.26 टक्के
- कागल –81.72 टक्के
- कोल्हापूर दक्षिण –74.95 टक्के
- करवीर – 84.79 टक्के
- कोल्हापूर उत्तर – 65.51 टक्के
- शाहूवाडी – 79.04 टक्के
- हातकणगंले – 75.50 टक्के
- इचलकरंजी – 68.95 टक्के
- शिरोळ – 78.06 टक्के
इतर महत्वाच्या बातम्या