Jitendra Awhad Whatsapp Viral Chat: 'मंत्री कसा राहतो, ''अजित'' पक्षात कसा ठेवतो बघू'; जितेंद्र आव्हाडांची चॅट व्हायरल, नेमकं खरं काय?
Jitendra Awhad Whatsapp Viral Chat: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल होत आहे.
Jitendra Awhad Whatsapp Viral Chat: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. सदर घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत, त्यांना करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (28 डिसेंबर) बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
बीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये संतोष देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आहेत. सुरेश धस, बजरंग सोनवणे, छत्रपती संभाजीराजे, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार तसेच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजेही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी घडलेल्या सदर घटनेबाबत आक्रोश व्यक्त केला. मात्र याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल होत आहे. याबाबत स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट करत सदर चॅट खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नेमकं काय?
उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे...मुंडेंविरोधात आणि वाल्या (वाल्मिक कराड) विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव...तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय, असा मेसेज आहे. तसेच मोर्च्यात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका...आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं...कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता..असंही व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये म्हटलं आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हॉट्सअॅप चॅटबाबत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
माझा खोटा व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा...
1) माझ्या व्हॉट्सअॅप डीपीवर माझा फोटो नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ज्यावेळेस संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ,"आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले आहे", असे अनुद्गार काढले. तेव्हापासून आंबेडकर ही फॅशन नाही तर "पॅशन" असे म्हणत हा डीपी मी ठेवलेला आहे.
2) मी कितीही रागात असलो, संतापलेलो असलो तरी 'अजित' असे कधीच म्हणत नाही. मी अजित पवार असाच उल्लेख करतो आणि शांत असलो तर 'अजितदादा' असे म्हणतो. हे आता मखलाशी, मस्का पॉलिसीसाठी लिहीत नाही. मी जे बोलतो ते स्पष्टच बोलतो.
3) हे खोटं चॅट व्हायरल करताना, 'दलित आणि मुस्लिमांना पैसे देऊन बोलव,' असे वाक्य माझ्या तोंडून निघाले आहे, असे दाखवितानाही हे चॅट करणाऱ्यांची धर्मद्वेषी, जातीद्वेषी मानसिकताच उघडकीस आली आहे. ही खोटं चॅट लिहितानाही या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या मनातील दलित आणि मुस्लिमांबद्दलचा द्वेषच उघडा पडला आहे.
4) दीपक केदार याची आणि माझी कुठेतरी एकदाच भेट झाली असून फक्त दोन ते तीन वेळा त्याच्याशी बोलणे झाले आहे. दीपक केदारचा उल्लेख करून आंबेडकरी नेता असा उल्लेख करत मनातला दलीत वेष उघड केला
5) सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या ज्या नंबरचा वापर मॉर्फ चॅटिंगसाठी करण्यात आला. तो नंबर म्हणजे 9930000001 हा साधा व्हॉट्सअॅप आहे. मात्र, ज्यांनी खोटी चॅट तयार केली. त्यांनी या नंबरवरील व्हॉट्सअॅप बिझनेस असल्याचे दाखविले. म्हणजेच, केवळ कुणाला तरी खुष करण्याच्या नादात स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतली आणि उघडे पडले, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
माझा खोटा वाॅटसॲप चॅट वायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा...
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 28, 2024
१) माझ्या वाॅटसॲप डीपीवर माझा फोटो नसून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ज्यावेळेस संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ,"आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले आहे", असे अनुद्गार काढले.… pic.twitter.com/kdU2idECdH
अजितदादांकडून स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठीच हा बालहट्ट- जितेंद्र आव्हाड
मला लक्ष्य करण्यासाठी खोटं लिहीले आणि एक्स्पोज झाले. या खोट्या चॅटसाठी कामाला लागलेली टीम अजितदादा यांना माहितही नसेल. पण, असे काही तरी उद्योग करून अजितदादांकडून स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठीच हा बालहट्ट केला अन् स्वतःच्याच पायात पाय अडकून उताणे पडले. खोटे करायलाही डोके लागते, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.