Jalna : मनोज जरांगेंच्या भेटीसाठी वेटिंग, उपोषणास्थळी गर्दीच गर्दी; राज्यभरातून लोक येतायत अंतरवाली सराटी गावात
Jalna News : सध्या अंतरवाली सराटी गाव मराठा आरक्षणाच्या मागणीचं केंद्रबिंदू बनला आहे. मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अनेक राजकीय नेते या गावात येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. त्यांच्या याच उपोषणास्थळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेनंतर राज्यभरात मराठा समाजात संताप पाहायला मिळाला. तर सध्या अंतरवाली सराटी गाव मराठा आरक्षणाच्या मागणीचं केंद्रबिंदू बनला आहे. मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अनेक राजकीय नेते या गावात येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी या ठिकाणी वेटिंग पाहायला मिळत आहे.
मागील दहा दिवसांपासून मनोज जरांगे अंतरवाली सराटी गावात उपोषण करत आहे. सध्या हे उपोषणाचं स्थळ राज्यातील मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनलं आहे. जरांगे यांची भेट घेण्यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकं गावात दाखल होतांना पाहायला मिळत आहे. गावात येताच मुख्य रस्त्यावर लांबच लांब गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत आहे. गावातील ग्रामपंचायत जवळ असलेल्या मंदिराच्या मैदानात जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. तर जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यात तरुणांचा मोठा सहभाग दिसत आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला असलेल्या अनेक गावातील नागरिक देखील याठिकाणी येतांना दिसत आहे. त्यामुळे जरांगे यांची भेट घेण्यासाठी वेटिंग पाहायला मिळत आहे.
सेल्फीसाठी गर्दी!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे जरांगे यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी तरुण अंतरवाली गावात मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. सध्या जरांगे यांना सलाईन लावली असल्याने प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांना भेट घेता येत नाही. त्यामुळे अनेकजण नमस्कार करुन फोटो काढून पुढे जात आहे.
जरांगे म्हणतात असा निर्णय घ्या
निजामकालीन कुणबी असल्याच्या नोंदी असणाऱ्या मराठा समाजातील कुटुंबीयांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही शांतपणे आंदोलन करत आहे. आमचे सहकारी आजही रुग्णालयात उपचार घेत आहे. तरीही आम्ही शांतपणे उपोषण करत आहे. त्यामुळे वंशावळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच आमच्याकडे पुरावे असल्याचं आम्ही आधीच सांगितले आहेत. त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदेश काढण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत, घेऊन जावेत," असे जरांगे म्हणाले
हेही वाचा