Manoj Jarange Patil: उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन हा एकप्रकारचा डाव, मनोज जरांगेंचं प्रवीण दरेकरांवर टीकास्त्र
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर मराठा आंदोलक धडकले. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली. मनोज जरांगे यांना आंदोलनामागे वेगळाच संशय.
जालना: वैयक्तिक कोणाच्याही दारात आपण आंदोलन करु शकतो. पण मराठ्यांचं कोणतंही आंदोलन सुरु नसताना तुम्ही आंदोलन करता म्हणजे हा डाव आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या एका गटाने मंगळवार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर आंदोलन केले. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मात्र, या मातोश्रीवरील या आंदोलनात भाजपचे काही कार्यकर्ते सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरील आंदोलनामागे वेगळा डाव असल्याची शक्यता बोलून दाखवली.
वैयक्तिक कोणाच्या दारात तुम्ही आंदोलन करू शकता. पण मराठ्यांचा आंदोलन सुरू नसताना तुम्ही आंदोलन करता, म्हणजे हा डाव आहे. सर्वच पक्षांना जाब विचारला पाहिजे. समाजाचं आंदोलन सुरू असले तर विचारला पाहिजे. जर ते नसेल तर ते अभियान आहे. सध्या कुठेही आंदोलन सुरू नाही. मराठा समाज सर्व नेत्यांना जाब विचारण्यासाठी सक्षम आहे. तुम्हाला काय गडबड आहे, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मराठे विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना देखील जाब विचारतील , मराठे सक्षम आहेत विचारायला. मुंबईत जाऊन घरात घुसून जाऊन विचारु, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
प्रवीण दरेकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे तीन तुकडे केले: मनोज जरांगे
विधानसभा निवडणुकीत भाजपचे जे आमदार उभे राहणार नाहीत, त्यांना आमच्याविरोधात बोलायला लावले जात आहे. प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून फडणवीसांनी मराठा समाजात फूट पाडण्याचे काम केले. प्रवीण दरेकर यांनी मराठा क्रांती मोर्चाचे तीन तुकडे केले. आरक्षणाच्या बैठकांना मराठा समाजाला बोलवायचे आणि त्यांना बदनाम करायचे काम प्रवीण दरकेर यांनी केले. विधानपरिषदेला आमदारकी मिळते, यासाठीच ते मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करतात. त्यांना फूस लावणारा कोकणातील एक नेता आहे. आता मराठा समाजाचे आंदोलन सुरु नाही. पण शांततेच्या काळात यांना आंदोलन घडवून आणायचे आहे. 7 ऑगस्टच्या सभेत ते काहीतरी घडवून आणू शकतात, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
कोकणात भरपूर नेते आहेत पण कोणता नेता मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे, हे मी सांगणार नाही. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
आणखी वाचा