पंतप्रधान साहेबांनी फडणवीसांना समज द्यावी, कार्यकर्त्यांना ते अंगावर घालू लागलेत; जरांगेनी थेट घेरलं
Maratha Reservation: पंतप्रधानांनी फडणवीसांना समज द्यावी, कार्यकर्त्यांना ते अंगावर घालू लागलेत, असं म्हणत जरांगेंनी थेट फडणवीसांवरही टीका केली आहे.
Manoj Jarange on Gunaratna Sadavarte : मराठा समाजाला (Maratha Samaj) भडकवा असं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), गुणरत्न सदावर्तेंना (Gunaratna Sadavarte) सरकारनं सांगितलं असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. तसेच, सदावर्तेंना समज द्या, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांना जरांगेंनी थेट केलं आहे. तसेच, पंतप्रधानांनी फडणवीसांना समज द्यावी, कार्यकर्त्यांना ते अंगावर घालू लागलेत, असं म्हणत जरांगेंनी थेट फडणवीसांवरही टीका केली आहे.
मराठा उपोषणकर्ते भर सभेत बोलताना म्हणाले की, "एक टरमाळं मधीच उठलं आणि लागलं मागे, तोदेखील उपमुख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता आहे, असं म्हणतात लोक. उपमुख्यमंत्र्यांनी येडपटं पाळतील कशी, त्यात उपमउख्यमंत्री एक आहेत, ती एक पंचायत झाली. ते रात्री म्हटलं मला (जरांगेंना) अटकच करा. तो म्हणतोय मी हिंसा करिन, अरे मराठ्यांची औलाद हिंसा करणारी नाही. त्याला यश मिळवायचं होतं, त्यावेळी त्यानं एक मराठा, लाख मराठ्याची घोषणा दिलेली आझाद मैदानात, पण आता एक लाख मराठे एकत्र आलेत, तर तिथं सांगतो ते हिंसा करणार आहेत, त्याला अटक करा. मला अटक करणं सोप्पं आहे का आता?"
फडणवीस साहेब त्याला समज द्या, तो तुमचा कार्यकर्ता : मनोज जरांगे
"तुला एकदा मराठ्यांनी सूट दिली, तू मराठ्यांचं वाट्टोळं केलंस. मराठा आरक्षणाच्या विरोधात तू कोर्टात गेला आहेस, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याला समज द्या, तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठे अंगाव घेऊ नका, याच मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार दिलेत, केंद्रात, राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, पंतप्रधान साहेबांनी फडणवीसांना समज द्यावी, कार्यकर्ते ते अंगावर घालू लागलेत.", असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण द्या, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील : मनोज जरांगे
"मी राज्याला, केंद्राला विनंती करतो, मराठा समाजाला आरक्षण द्या, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना तातडीनं आरक्षण जाहीर करा, मराठे इकडं-तिकडं नाचण्यापेक्षा दिल्लीपर्यंत गुलाल घेऊन ट्रकच्या ट्रक घेऊन येतील. आम्हाला तुमच्या राजकारणाचं काही नाही करायंच, आम्हाला आमच्या लेकरांचं कल्याण करायचं आहे.", असं जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, सरकारला दिलेल्या 40 दिवसांपैकी 10 दिवस उरले असून या दहा दिवसांत आरक्षण द्या अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची, असा इशारा जरांगेंनी दिला आहे. शिवाय 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरेल असंही जरांगे म्हणाले. या विराट सभेसमोर जरांगेंनी छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. मराठा समाजाला उसकवा, असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भुजबळ आणि सदावर्देंना सांगितल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. शिवाय सरकारनं आपलं फेसबुक अकांऊटही बंद केल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :