Jalna News: जालन्यातील मोती तलावात चार टन मासे मृत, परिसरात खळबळ; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल
Jalna News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) या प्रकाराची दखल घेतली आहे.
Jalna News: जालना शहरात (Jalna City) धक्कादायक घटना समोर आली असून, मोती तलावातील शेकडो मासे (Fish) मृत पावल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. जालना पालिकेने शनिवारी सर्व मासे गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर यावेळी जवळपास चार टन मासे मृत पावल्याचे समोर आले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) या प्रकाराची दखल घेतली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मासे मृत पडण्याचे कारण प्रशासनाकडून शोधले जात आहे.
जालना शहरातील मोती तलावाच्या पाण्यावर मृत मासे तरंगत असल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकाराने परिसरात आणि शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान याची माहिती मिळताच पालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत कळवले आहे. माहिती मिळताच मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोती तलावाची पाहणी करून, मृत माशांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच या मागील कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. मात्र प्रथमदर्शनी तपासणीदरम्यान कोणत्या मार्गाने प्रदूषण झाले याची माहिती पथकाला मिळू शकली नाही. मात्र माशांचे नमुने तपासल्यानंतर मासे कशामुळे मृत पावले हे समोर येणार आहे.
तलावात होणारे प्रदूषण थांबवण्याची मागणी
जालना शहरातील मोती तलावाच्या पाण्यावर मृत मासे तरंगत असल्याची माहिती मिळाल्यावर पालिका प्रशासनाने देखील तलावाची पाहणी केली. त्यानंतर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने शनिवारी सकाळी सर्व मासे एकत्र करून त्याची डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावली आहे. तसेच शनिवारी नव्याने मासे मृत पावल्याचा प्रकार समोर आलेला नाही अशी माहिती पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर देखील मोती तलावात वाहने धुण्याचा आणि कपडे धुण्याचा प्रकार शनिवारीही सुरूच होता. त्यामुळे तलावात होणारे प्रदूषण थांबवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकांचा संताप!
दरम्यान, मोती तलावातील मृत मासे बाहेर काढल्यावर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते गांधीनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली उघड्यावर आणून टाकल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हा मुक्या प्राण्यांसह नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या मृत माशांची तात्काळ योग्य रीतीने विल्हेवाट न लावल्यास थेट पालिकेत हे मासे आणून टाकू, असा स्थानिकांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Abdul Sattar: कृषीमंत्र्यांना नुकसानभरपाईची आठवण करून देण्यासाठी शेतकरीपुत्रांनी गाठलं मंत्रालय