Abdul Sattar: कृषीमंत्र्यांना नुकसानभरपाईची आठवण करून देण्यासाठी शेतकरीपुत्रांनी गाठलं मंत्रालय
Jalna News: शेतकऱ्यांच्या मुलांनी थेट मंत्रालय गाठून कृषीमंत्र्यांना नुकसानभरपाईच्या आश्वासनाची आठवण करून दिली.
Jalna News: राज्यातील विविध भागात ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. नवीन सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांवरती ओढवलेल्या या संकटांवर मात करण्यासाठी सरकार दरबारी वेगवेळ्या नेत्यांचे दौरे झाले. त्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील राज्यातील अतिवृष्टीमुळे नष्ट झालेल्या पीक पाहणीसाठी दौरा केला. तर जालना जिल्ह्याचा (Jalna District) देखील सत्तार यांनी दौरा करत शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. मात्र आश्वासन देऊन चार महिने उलटूनही छदामही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी थेट मंत्रालय गाठून कृषीमंत्र्यांना नुकसानभरपाईच्या आश्वासनाची आठवण करून दिली.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ऐन सोंगणी, मळणीत आलेली पीक जमीनदोस्त झाली. यात जालना जिल्ह्यातील तब्बल 4 लाख 242 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. तसेच 5 लाख 98 हजार 696 शेतकरी बाधित झाल्याचा अंतिम अहवाल जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी 1 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवला होता. दरम्यान 27 ऑक्टोबर रोजी जालना दौऱ्यावर अतिवृष्टीची नुकसान पहाणी करण्यासाठी आलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे गावात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी 15 दिवसात पंचनामे करून मदतही देणार असल्याचं शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते.
शेतकऱ्यांनी थेट मंत्रालय गाठलं!
स्वतः कृषीमंत्री गावात येऊन पाहणी करून गेले आणि मदतीचं आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे पाहणीसाठी आलेल्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून मदत देणार असल्याचं ठोस आश्वासन दिले होते. मात्र कृषीमंत्री सत्तार यांनी आश्वासन देऊन चार महिने उलटूनही शेतकऱ्यांना एक रुपयाही मदत मिळाली नाही. त्यामुळे अखेर बरंजळा लोखंडे गावातील शेतकरी नारायण लोखंडे आणि त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी थेट मुंबईत मंत्रालय गाठून कृषीमंत्र्यांना आपल्या आश्वासनाची आठवण करून दिली. यावेळी या शेतकऱ्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना अतिवृष्टीची मदत आणि पीक विम्याचा लाभ मिळण्याबाबत निवेदन देऊन गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली.
यांनाही दिले निवदेन...
दरम्यान यावेळी या शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकाकडे देखील कापूस सोयाबीन भाव वाढीसाठी आवाज उठवावा अशी मागणी करून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विद्यमान मंत्री शुंभुराज देसाई, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री अतुल सावे ,तसेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना निवदेन दिले.
इतर महत्वाच्या बातम्या: