Jalna News : मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीपाठोपाठ वडीकाळ्या गावात ड्रोनच्या घिरट्या, जालन्यात एकच खळबळ
Jalna News : काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीत ड्रोन घिरट्या घालत असल्याचे समोर आले होते. यानंतर आता वडीकाळ्या गावात ड्रोन घिरट्या घालत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जालना : काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) ड्रोन (Drone) घिरट्या घालत असल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता जालन्यातील (Jalna) अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात (wadikalya jalna) ड्रोनच्या घिरट्या घालत असल्याचे समोर आले आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वडीकाळ्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) या गावात ड्रोन घिरट्या घालत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेपाठोपाठ आता वडीकाळ्या गावात असाच प्रकार घडला आहे.
वडीकाळ्या गावात ड्रोनच्या घिरट्या
जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात गेल्या आठ ते दहा दिवसापासून रात्री ड्रोन घिरट्या घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या सुमारास ड्रोन वडीकाळ्या गावात घिरट्या घालत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. यासंदर्भात गावातील ग्रामस्थांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने या ड्रोनचा छडा लावून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
ड्रोन फिरत असले तरी मी घाबरणार नाही : मनोज जरांगे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या घरावर एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले होते. मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळ आणि ते राहत असलेल्या घराची ड्रोनद्वारे टेहळणी सुरु असल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी घराच्या गच्चीवर जाऊन पाहणी केली. या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तक्रार दिली होती. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते की, अंतरवाली सराटी येथे ड्रोन फिरत आहेत. मी समाजाकरिता आरक्षण लढा लढत आहे, ड्रोन फिरत असले तरी मी घाबरणार नाही, माझा लढा सुरूच राहील, कोणाला काय साध्य करायचे आहे हे माहित नाही, मी घाबरुन माझा आरक्षण लढा थांबवणार नाही, असे त्यांनी सांगितले होते.
आणखी वाचा