उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसला धोका देणार, अनिल पाटलांचा दावा; आता पृथ्वीराज चव्हाणांकडून खरपूस समाचार; म्हणाले...
Prithviraj Chavan on Anil Patil : उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे कधीही काँग्रेसला धोका देऊ शकतात, असा दावा अनिल पाटील यांनी केला होता. यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी अनिल पाटील यांना प्रत्युत्तर दिले.
Prithviraj Chavan on Anil Patil : सध्या काँग्रेस पक्षामध्ये दहा जण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने त्यांना 288 जागा लढवल्या खेरीज पर्याय नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे कधीही काँग्रेसला (Congress) धोका देऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केला होता. यावरून माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अनिल पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमच्यात कुणी भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये
अनिल पाटील यांच्या दाव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही सर्व पक्ष ताकदीने लढणार असून आमच्यात कुणी भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचा असेल तर हे अन्यायकारी भ्रष्ट सरकार घालवले पाहिजे. महाविकास आघाडीत मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ असे काही नाही. राज्य सरकारचा जर पराभव करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीच्या विजयाने कार्यकर्त्यांनी होळून जाऊ नये. केंद्राच्या राजकारणापेक्षा राज्याच्या राजकारणातील विषय हे वेगळे आहेत. म्हणून आम्हीच संपूर्ण ताकतीने छोट्या पक्षांना घेऊन ही निवडणूक लढणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
...म्हणून आम्ही 288 जागांबाबत अर्ज मागवून घेतले
आम्हाला आमची ताकद वाढवायची आहे. म्हणून आम्ही 288 जागांबाबत अर्ज मागवून घेतले आहेत. जो उमेदवार महाविकास आघाडीसाठी योग्य असेल तो आम्हाला चाचपणी केल्यानंतर नेमका कसा ते कळेल, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे व शरद पवार यांना न्याय मिळावा
शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट सुनावणीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दोनही पक्षांच्या बाबतीतल्या सुनावण्या या वेळेवर व्हाव्यात. उद्धव ठाकरे व शरद पवार यांना न्याय मिळावा. मागील काळात जो निर्णय झाला तो अन्यायकारक आहे. तो निर्णय आम्हाला मान्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
बैठकीच्या अगोदर बोलणे उचित ठरणार नाही
मराठा आरक्षणावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दल उद्या राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आमचे प्रतिनिधी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे बैठकीला जातील. त्या अगोदर बोलणे उचित ठरणार नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!