Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये न जाता शरद पवार गटातच राहणार असल्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्याच पक्षातील नेत्याने एकनाथ खडसेंना आव्हान दिलंय.
जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपमध्ये (BJP) न जाता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातच (NCP Sharad Pawar Group) राहणार असल्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यांच्याच पक्षातील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील (Satish Patil) यांनी त्यांना निष्ठा सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यापुढे राष्ट्रवादी पक्षातही पुढील काळात आव्हान असल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपने आपल्या प्रवेशाबाबत प्रतिसाद दिला नसल्याने आपण आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटात राहून सक्रिय होऊन काम करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. मात्र एकनाथ खडसेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आक्षेप नोंदविला आहे.
प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो : सतीश पाटील
एकनाथ खडसे यांचं नाव न घेता सतीश पाटील यांनी म्हटल आहे की, ज्यांना यायचं त्यांना येऊ द्या, मात्र त्यांनी आपली निष्ठा सिद्ध करावी. ते सध्या कोणत्या पक्षात आहेत हे शरद पवार आणि जयंत पाटील यांनीही सांगायला हवे, कारण अशा कार्यकर्त्यांमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असे डॉ. सतीश पाटील यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेत आहेत. त्या पक्षातच त्यांच्या निष्ठेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असल्याने एकनाथ खडसे यांच्या पुढे राष्ट्रवादी पक्षात देखील आव्हान असल्याचे दिसून येत आहे.
नेमकं काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
दरम्यान, भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता. तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही. याचा अर्थ जे पी नड्डा यांच्यापेक्षा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते मोठे आहेत, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा