(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mother Brave Story : आई ती आईच! बाळाच्या अंगावर नागाचा विळखा, तिनं झटक्यात नागाला बाहेर फेकलं, पण...
Mother Brave Story : रात्रीची वेळ, घरात आई आणि तिचे तान्हे बाळ झोपलेले, असताना रात्री अचानक बाळ रडायला लागले.
Jalgaon News : आई आपल्या बाळासाठी कधी रणरागिणी तर तर कधी हिरकणी (Hirakani) होऊन जीवापाड जपते. याची अनेक उदाहरणे आहेत. अशी एक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात समोर आली आहे. रात्रीची वेळ, घरात आई आणि तिचे तान्हे बाळ झोपलेले. रात्री अचानक बाळ रडायला लागले. आईला जाग आली पाहते तर बाळाच्या अंगावर चक्क नाग. क्षणाचा ही विलंब न करता आईने या नागाला पकडून दूर फेकले आणि तेव्हा एवढ्यातच नागाने तिच्या हाताला दंश केला. गेल्या पाच दिवसांपासून आईची मृत्यूची झुंज सुरू होती, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर तिने या लढाईवर मात केली.
एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील महिंदळे येथे घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळे गावातील भिकन राजपूत यांची कन्या ज्योती ही प्रसूती नंतर चार महिन्यापासून आपल्या वडिलांकडे माहेरी मुक्कामी होती. याच दरम्यान आपल्या बाळासोबत त्या झोपल्या असताना, मध्यरात्रीच्या सुमारास जाग आली असता त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्यांच्या बाळाच्या भोवती एका नागाने विळखा घातल्याचे त्यांना दिसले. कोणताही मागचा पुढचा विचार न करता मोठ्या हिमतीने आपल्या बाळाचां जीव वाचविण्यासाठी त्या नागाला हाताने पकडून बाजूला फेकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी नागाने (Snake) त्यांना दंश केले.
महिंदळे येथील भिकन नरसिंग राजपूत यांची कन्या ज्योती (Jyoti Rajpoot) हिचे सासर एरंडोल तालुक्यातील बांभोरी येथील असून ती काही दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. प्रसूतीनंतरच्या उपचारानंतर ती माहेरीचं आरामासाठी थांबली होती. मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास आई व बाळ दोघे झोपेत असताना बाळ रडायला लागले, म्हणून आई झोपेतून उठली. पाहते तर काय बाळाच्या अंगावर नाग फणा उगारून बसला होता. आईला त्यावेळी काहीच सुचलं नाही. मात्र बाळासाठी जीवाची बाजी लावणारी ज्योतिमधली हिरकणी जागी झाली. तिने क्षणाचाही विलंब न करता नागाला हातात पकडून दूर फेकले, मात्र याचवेळी नागाने तिला दंश केला.
तिच्या जिगरबाज धाडसाचे कौतुक
दरम्यान विषारी नाग असल्याने काही वेळातच ज्योती यांची प्रकृती ढासळत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. ज्योती यांच्या वडिलांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालात दाखल करण्यात आले. त्यानंतर लागलीच पाचोरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पाच दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर ज्योती यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. तिच्या जिगरबाज धाडसामुळे बाळाचे प्राण वाचले, आपल्या बाळाला वाचविण्यासाठी ज्योती यांनी आपल्या जीवाची बाजी लावल्याने त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.