Maharashtra Jalgaon News : जळगाव दूध संघाची निवडणूक जाहीर; खडसे आणि गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
Maharashtra Jalgaon News : जळगाव दूध संघाची निवडणूक जाहीर. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Maharashtra Jalgaon News : जळगाव दूध संघाची (Jalgaon District Milk Association Election) निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून या दूध संघावर एकनाथ खडसेंचं वर्चस्व आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे सत्ता राखणार की, गिरीश महाजन विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जळगाव जिल्हा दूध संघावर मागील सहा वर्षांपासून एकनाथ खडसे गटाचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र शिंदे सरकार आल्यानंतर जळगाव दूध संघात अपहार आणि चोरीच्या घटनांबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले आहेत. दूध संघावर आपलं वर्चस्व मिळवण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली असताना, येत्या दहा डिसेंबर रोजी दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यानं या दूध संघात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 3 नोव्हेंबरपासून इच्छुकांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दूध संघाची निवडणूक होणार आहे. दूध संघाच्या 20 संचालकांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली आहे.
दूध संघात चोरी, अपहार प्रकरणावरून दूध संघातील राजकारण आधीच तापलं आहे. आता निवडणूक जाहीर झाल्यामुळं पुन्हा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चोरी अपहाराचं प्रकरण नेमकं काय?
जळगाव जिल्हा दूध संघातील दूध पावडर तसेच लोणी घोटाळाप्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांच्या अपहाराची तक्रार पोलिसात दिली होती. तर एकनाथ खडसे संचालक मंडळाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली होती. या दोन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी स्वतःच या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घोटाळ्यात पोलिसांनी थेट कुणाचंही नाव न घेता या घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानं दूध संचालक मंडळ किंवा अन्य जबाबदार कोण आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा दूध संघाच्या चेअरमन म्हणजेच अध्यक्षा एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आहेत. आता जिल्हा दूध संघाच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. या घटनेत पोलीस काय तपास करतात? जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्यात नेमकं कोण दोषी? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :