(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'खडसें'चं आंदोलन 'खडसें'च्या अंगलट येणार? जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
एकनाथ खडसे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला असला तरी आता जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
Eknath Khadse Jalgaon News: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर आणि लोणी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्यात तब्बल नऊ तास आंदोलन केले. त्यानंतर त्या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होवून गुन्हा दाखल केला. एकनाथ खडसे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला असला तरी आता जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
जिल्हा दूध संघातील दूध पावडर तसेच लोणी घोटाळाप्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांच्या अपहाराची तक्रार पोलिसात दिली होती तर एकनाथ खडसे संचालक मंडळाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली होती. या दोन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी स्वतःच या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
या घोटाळ्यात पोलिसांनी थेट कुणाचेही नाव न घेता या घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने दूध संचालक मंडळ किंवा अन्य जबाबदार कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा दूध संघाच्या चेअरमन म्हणजेच अध्यक्षा एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आहेत. आता जिल्हा दूध संघाच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. या घटनेत पोलीस काय तपास करतात? जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्यात नेमकं कोण दोषी? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हा दूध संघातील अपहारासंबंधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात 14 ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन केलं होतं. मेलो तरी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा इशारा खडसेंनी दिला होता. त्यानंतर तब्बल 9 तासांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करुन घेतला होता. एकनाथ खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलिस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केलं होतं. अखेर या प्रकरणी आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ही बातमी देखील वाचा