भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन जळगाव जिल्ह्यात शिंदे गट, भाजपात वादाची ठिणगी; प्रकरण नेमकं काय?
Maharashtra Jalgaon News : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन जळगाव जिल्ह्यात शिंदे गट, भाजपात वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आमने-सामने

Maharashtra Jalgaon News : राज्यात शिंदे गट आणि भाजप (BJP) युतीतील सरकार आहेत. मात्र जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोऱ्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन शिंदे गट आणि भाजप आमनेसामने आल्याचं पहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी एकमेकांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचं बघायला मिळतंय. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना (Shiv Sena) प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि पाचोरा येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी पाचोरा नगरपालिकेत 200 कोटी रूपयांचा भुखंड घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर पाचोरा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. तुम्ही सुरुवात केलीय, त्याचा शेवट मी करेन, या शब्दांत आमदार किशोर पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिलं असून दंड थोपटले असल्याचं पाहायला मिळत आहेत.
पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना या काळात 200 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवर पत्रकार परिषद घेऊन आमदार किशोर पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधीत भूखंडांचे आरक्षण काढण्याची प्रक्रिया ही नियमांनुसार होत असून यात नगरपालिकेचा अथवा आपला कोणताही संबंध नसल्याचं ते म्हणाले आहेत. तर, याऊलट भाजपचे अमोल शिंदे यांच्या वडिलांना पाचोरा शहरातील अनेक भूखंड हडप करून यावर व्यापारी संकुल आणि शाळा बांधल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विरोधकांनी आता आरोप करून हे प्रकरण सुरू केलं असलं तरी याचा शेवट आपण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर विरोधकांचे विविध घोटाळे आपण काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. संबंधितांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, या ब्लॅकमेलर लोकांनी आम्हाला शिकवू नये, आमच्यावर आरोप करणऱ्यांविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचंही यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























