Ganesh Chaturthi 2022 : तुरटीपासून घडवला बाप्पा; जळगावातील पहिला प्रयोग
Ganesh Chaturthi 2022 : यंदा जळगावच्या बाजारपेठेत तुरटी पासून बनविण्यात येणारे गणपती विक्रीसाठी आले आहेत.
Ganesh Chaturthi 2022 : पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येणारे म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूच्या मातीचे गणपती (Ganesh Chaturthi 2022) आपण नेहमीच पाहत आलो आहोत. मात्र, यंदा जळगावच्या बाजारपेठेत तुरटी पासून बनविण्यात येणारे गणपती विक्रीसाठी आले आहेत. हे गणपती पर्यावरणपूरक असल्याचा दावा हे गणपती बनविणाऱ्या ममता काबरा यांनी केला आहे. शासनाच्या 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' या उपक्रमास हातभार लागावा, यासाठी जळगावातील ममता काबरा या पुढे सरसावल्या आहेत. काबरा यांनी तुरटीपासून अत्यंत आकर्षक अशा गणपतीच्या मूर्ती तयार केल्या आहेत.
जळगाव शहराजवळच असलेल्या चिंचोली गावात ममता काबरा यांचा तुरटी बनविण्याचा व्यवसाय आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून बाप्पाच्या कृपेने हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत असल्याची ममता काबरा यांची श्रद्धा आहे. बाप्पावरील श्रध्देपोटीच बाप्पाच्या भक्तीबरोबरच त्यांची सेवा व्हावी म्हणून ममता काबरा यांनी तुरटी पासून गणपती बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर त्यांनी गणपती बनविले होते. त्यात त्यांना यश मिळाल्याने यंदा त्यांनी व्यावसायिक पातळीवर तुरटीपासून अत्यंत आकर्षक अशा गणपतींची मूर्ती तयार केली आहे. साडेतीन हजार गणपतींच्या मूर्तींची त्यांनी निर्मिती केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तुरटी पासून बनविलेले गणपती :
पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या गणपती मूर्तीमध्ये वापरण्यात येणारे रंग आणि प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे हे गणपती पाण्यात विसर्जन करताना प्रदूषण होत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, तुरटी ही पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जात असल्याने यापासून पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही. शिवाय पाणी शुद्ध होण्यास मदत होईल. तुरटी पासून बनविलेले गणपती हे पर्यावरण पूरक असल्याचा दावा ममता काबरा यांनी केला आहे
विविध आकारात अतिशय कमी रंग वापरून त्यांनी स्थानिक मजुरांना प्रशिक्षण देत हे गणपती बनविण्यात आले आहेत. साधारणपणे दोनशे ते पाचशे रुपयांत तयार होणारे गणपती हे बाजारपेठेत पाचशे ते बाराशे रुपयांपर्यंत मागणीनुसार विकले जाणार असल्याचं काबरा यांचं म्हणणं आहे. या गणपतीला बाजारपेठेत यंदा चांगली मागणी असल्याने त्यांनी पंधरा मजुरांना हाताशी घेऊन साडेतीन हजार मूर्ती विक्रीसाठी तयार केल्या आहेत. यासाठी ज्या गावात त्यांची कंपनी आहे, त्याच गावातील स्थानिक महिलांना प्रशिक्षण देत रोजगार सुध्दा उपलब्ध करुन दिला आहे. पूर्वी शेतामधे उन्हातान्हात काम करणाऱ्या महिलांना सावलीत बसून वर्षभर काम मिळत असल्याने गावातील महिला मोठ्या आवडीने हे काम करीत असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :