Jalgaon News : पत्नीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, पतीनंही उचललं टोकाचं पाऊल, सासऱ्यांचा जळगावच्या झेडपी सीईओंवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
Jalgaon News : जिल्ह्याच्या शासकीय आशादीप संस्थेच्या अधिक्षिका मयुरी राऊत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या पतीनेही टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
जळगाव : जिल्ह्याच्या शासकीय आशादीप संस्थेच्या अधिक्षिका मयुरी राऊत (Mayuri Raut) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना काल घडली. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचे पती आणि जिल्हा परिषदेतील कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत (Devendra Raut) यांनीही काल आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली आहे.
सध्या देवेंद्र राऊत यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेला जिल्हा परिषद मुख्याधिकारी अंकित जबाबदार असल्याचा आरोप मयुरी राऊतचे वडील भाऊसाहेब करपे यांनी केलाय. झेडपी सीईओ अंकित यांनी देवेंद्र राऊत यांना सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे मानसिक तणावातून ही घटना घडली असल्याचा गंभीर आरोप भाऊसाहेब करपे यांनी केलाय.
....तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही
मानसिकदृष्ट्या टॉर्चर करणाऱ्या मुख्याधिकारी अंकित यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा मृत मयुरी राऊतांच्या वडिलांनी दिला आहे. या घटनेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देखील भाऊसाहेब करपे यांनी केली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
याबाबत एबीपी माझाने गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही घटना घडल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. प्राथमिक माहितीनुसार राऊत यांना त्यांच्या पत्नी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. राऊत यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची पत्नी फोनवर बोलत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्या हॉस्पिटलच्या बाहेर पडल्या. त्यानंतर हॉस्पिटलच्या लोकांनी त्यांना उचलून जवळच्या दवाखान्यात दाखल केले. परंतु, त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत त्यांच्या पतीला समजल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर कलेक्टरांनी फोन केल्यानंतर पतीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी मी जाऊन आलो. गिरीश महाजन यांनी देखील तेथे भेट दिली. माझ्या माहितीप्रमाणे त्या ताईंना हृदयविकाराचा झटका आला आहे. झालेली घटना अत्यंत वाईट आहे. त्यांना दोन वर्षाची आणि एक सहा वर्षाची मुलगी आहे. ते संगमनेरचे राहणारे आहेत. मात्र, जोपर्यंत पोस्टमार्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत याबाबत स्पष्टता होणार नाही.
...तर मी पालकमंत्री म्हणून या घटनेत लक्ष घातलं असतं
मयुरी राऊत यांच्या वडिलांनी झेडपीचे सीईओ अंकित हे त्यांच्या जावयाला सातत्याने अपमानास्पद वागणूक देत होते याबाबत तुम्ही काही चौकशी केली आहे का? असे विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्याकडे आजपर्यंत याबाबत कुठलीही माहिती नाही. मी पाच वर्षापासून या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मी राऊत यांना पाहिले होते. त्यांनी चांगलं काम केलं म्हणून सीईओंच्या हातून त्यांना बक्षीस देण्यात आलं त्यामुळे मला असे वाटत नाही की त्यांच्यात असे तणाव असतील. पण, मयुरी राऊत यांच्या वडिलांकडे काय माहिती आहे. याबाबत मला सांगता येणार नाही. पण प्राथमिक दृष्ट्या अशी घटना घडली असती तर मी स्वतः पालकमंत्री म्हणून या घटनेत लक्ष घातले असते. परंतु प्राथमिक माहितीनुसार असं काही आढळून आलेले नाही, असे गुलाबराव यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा