Jalgaon News : आर एल ज्वेलर्सवरील ईडीची कारवाई राजकीय षडयंत्र, जळगावमधील संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Jalgaon News : राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील ईडी कारवाईच्या निषेधार्थ दहा संघटनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
जळगाव : राजमल लखीचंद ज्वेलर्स (RL Jewellers) यांच्यावरील इडी कारवाईच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह (Peoples Republican Party) विविध दहा संघटनातर्फे उद्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील कारवाई अन्यायकारक असून जैन परिवाराला कारवाईमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजमल लखीचंद ज्वेलर्स (Rajmal Lakhichand Jwellers) या समूहावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या सकाळी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Jwellers) ईडीने छापेमारी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडाली. या कारवाईमुळे जळगाव येथील सराफ असोसिएशने देखील जैन कुटुंबियांना अडचणीत आणण्यासाठी कारवाई केली जात असल्याचे बोलले जात आहे. अशातच ईडी कारवाईच्या निषेधार्थ उद्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
जन आक्रोश मोर्चाच्या आयोजनाबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे मालक माजी खासदार ईश्वरलाल जैन तसेच माजी आमदार मनीष जैन यांच्यावर झालेली ही ईडीची कारवाई राजकीय षडयंत्र आहे. यापूर्वीही जळगाव शहरातील माजी मंत्री सुरेश दादा जैन यांना संपवण्यासाठी राजकीय षडयंत्र करण्यात आलं होतं. आता ईडीच्या कारवाईच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाज असलेल्या जैन धर्मियांना संपविण्याचा हे मनुवादी राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही यावेळी जगन सोनवणे यांनी केला असून या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान या कारवाईच्या माध्यमातून ईश्वरलाल जैन माजी आमदार जैन व त्यांच्या कुटुंबीयांची समाजात बदनामी करून त्यांना संपविण्याचा डाव आहे. त्याचा निषेध करण्यासाठी उद्या रेल्वे स्थानकापासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह विविध 10 संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसह घुसाळातील पाण्याचा प्रश्न तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांची बदली करावी, तसेच सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यान्न घोटाळ्याच्या आरोपाखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी केली, त्यांची जाहीर माफी मागावी, यासह विविध मागण्यांसाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.