(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon : होमवर्क केला नाही म्हणून नऊ वर्षाच्या मुलाला अर्धनग्न करत मारहाण, क्लासमधील शिक्षिकेचा प्रताप
Jalgaon Crime : जळगाव शहरातील कोथारी या खासगी क्लासमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून होमवर्क केला नाही म्हणून मुलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
जळगाव : होमवर्क केला नाही म्हणून एका खाजगी क्लासच्या शिक्षिकेने (Private Class Teacher) नऊ वर्षाच्या मुलाला अर्धनग्न करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी जळगाव (Jalgaon) शहरात घडली. पल्लवी इंदानी रा. मगर पार्क , वाघनगर असं या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी त्या शिक्षिकेविरुद्ध पोलिसात तक्रार दिली असून त्यावरून जळगाव शहरातील शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील गुरुनानक नगर भागात राहणारे योगेश गणेश ढंढोरे यांचा नऊ वर्षाचा मुलगा खुशाल हा बळीराम पेठेतील कोठारी नावाने असलेल्या खाजगी क्लास (Private Class Teacher) येथे शिकण्यासाठी जातो. शहा दाम्पत्य संचलीत या क्लासमधे पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. या क्लासमधील पल्लवी इंदानी या शिक्षिकेने होमवर्क केला नाही या कारणावरून खुशाल या नऊ वर्षाच्या बालकाच्या अंगातून टीशर्ट काधून त्याला वर्गात उभे केल्याचा आणि त्याला चापटांनी मारहाण केल्याची घटना घडली. खुशाल याचे वडील योगेश ढंढोरे यांनी पोलिसात (Jalgaon Police) दिलेल्या तक्रारीत तसं नमूद केलं आहे.
क्लासमध्ये नेहमी मारहाण होत असल्याचे खुशाल याने पालक योगेश ढंढोर यांना या आधीही सांगितलं होतं. या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे बघण्यासाठी त्यांनी अचानक या क्लासमधे प्रवेश केला असता खरा प्रकार उघड झाला. पालक समोर येताच या शिक्षिकेने विद्यार्थी बालकास त्याचे कपडे परत दिले.
दरम्यान, या प्रकरणी खासगी क्लासच्या शिक्षिका (Jalgaon Private Class Teacher) पल्लवी इंदानी हिच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली असून शिक्षिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेसंदर्भात पोलीस चौकशी करीत असून प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या घटनेबाबत मनसेच्या विद्यार्थी सेनेने (MNS Vidyarthi Sena) त्या शिक्षिकेच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: