(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha : सिनेस्टाईलने सापळा रचून 264 किलो गांजासह 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Wardha Crime : चारचाकी वाहनाने अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींनी वर्धा गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे.
वर्धा : गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने सिनेस्टाईल सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. यावेळी आरोपींकडून तब्बल 264 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून एकूण 30 लाख 5 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बोरगाव (ढोले) फाटा, नॅशनल हायवे कारंजा येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनामधील सीटमध्ये बॉक्स करून त्यात आणि गाडीच्या डिक्कीमध्ये गांजाची वाहतूक करत असल्याचे आढळून आलं. याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
कारच्या सीटमध्ये बॉक्स करून ठेवला होता गांजा
चारचाकी वाहनाने अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस स्टेशन कारंजा हद्दीतील बोरगाव (ढोले) फाटा, नॅशनल हायवे क्र. 6 वर नाकेबंदी केली असता पोलिसांना मिळालेल्या माहिती प्रमाणे पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच -31/ सीआर-8527 ही चारचाकी येताना दिसली. वाहनाला थांबवून वाहनाची झडती घेतली असता आरोपी कय्युम शहा शहन शहा (वय 34 वर्ष) रा. रहेमतनगर, बोरगाव, जि. अकोला, आणि शरद बाळू गावंडे (वय 32 वर्ष) रा. जुनी वस्ती पठाणपुरा, चौक मुर्तीजापूर, जि. अकोला हे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनामधून गांज्याची वाहतूक करत असल्याचं आढळून आले.
एकूण 30 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार आणि काळ्या बिया, पाने, फुले यांचा समावेश असलेली ओलसर हिरवट रंगाची कॅनाबिस वनस्पतीची ‘गांजा’ नावाचा अंमली पदार्थ निव्वळ गांजाचे वजन 265 किलो 325 ग्रॅम, प्रत्येकी 10,000 रूपयांप्रमाणे 26 लाख 53 हजार 250 रुपये तसेच आरोपींचे दोन जिओ कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 30 लाख 05 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कय्युम शहा शहन शहा आणि शरद बाळू गावंडे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कारंजा येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली कारवाई
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पो.नि. संजय गायकवाड, स्था.गु.शा. वर्धा, पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, यांचे निर्देशाप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड,प्रमोद जांभूळकर, संतोष दरगुडे, हमीद शेख, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, अवि बनसोड, संजय बोगा, दिनेश बोथकर, अनुप कावळे संघसेन कांबळे, विकास अवचट राकेश आष्टणकर, नितीन मेश्राम,मनीष कांबळे, गणेश खेवले यांनी केली.