(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'उद्धव ठाकरेंचं कर्तुत्व शून्य, बापाच्या जीवावर मतं मागू नका', अनिल पाटलांचे प्रत्युत्तर
Anil Patil : किती दिवस बापाच्या जीवावर मत मागणार आहात. उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी आपलं कर्तृत्व दाखवावं. बापाच्या जीवावर फार काळ राजकारण आपल्याला बघायला मिळणार नाही, अशी टीका अनिल पाटील यांनी केली.
Anil Patil जळगाव : दिल्लीतला बाप आला तरी मुंबई वेगळी होणार नाही. जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करु, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. यावरून मदत व पुनर्वसन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
अनिल पाटील म्हणाले की, किती दिवस आपण बापाच्या जीवावर मत मागणार आहात. उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी आपलं कर्तृत्व दाखवावं. बापाच्या जीवावर फार काळ राजकारण आपल्याला बघायला मिळणार नाही. उद्धव ठाकरे यांचे कर्तुत्व शून्य आहे. राज्यात जनतेने आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली होती. मात्र, आपले कर्तुत्व उद्धव ठाकरेंना दाखवता आले नाही. उद्धव ठाकरे आपले कर्तुत्व सिद्ध करा, बापाचा जीवावर मत मागू नका, अशी टीका त्यांनी केली आहे.
उत्तर महाराष्ट्रात दोन जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) जागावाटपाबाबत अनिल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादीची ताकद पाहता किमान दहा ते बारा लोकसभेच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे.
...तरीही मी पक्षाचा प्रचार करत राहील
लोकसभेच्या उमेदवारीबाबत पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितल्यास राज्यात कुठल्याही मतदारसंघातून उभा राहील. पक्षाने उमेदवारी न दिल्यास पक्षाचा प्रचार करत राहील, अशी स्पष्टोक्ती मंत्री अनिल पाटलांनी दिली आहे.
अनिल पाटलांचा रोहित पवारांना टोला
अजित पवारांच्या जवळची लोक त्यांना फसवत आहेत, अशी टीका रोहित पवारांनी केली होती. या टिकेवर मंत्री अनिल पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनिल पाटील म्हणाले की, रोहित पवारांनी आपल्या अनुभवाचा विचार केला पाहिजे. दिल्ली फार लांब आहे. जेवढी पात्रता आहे तेवढेच त्यांनी बोलावे, असे त्यांनी म्हटले.
मनोहर जोशी यांची कारकीर्द अत्यंत संयमी
राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले. याबाबत अनिल पाटील म्हणाले की, मनोहर जोशी यांची कारकीर्द अत्यंत संयमी होती. त्यांच्या कारकिर्दीत झालेले निर्णय सगळ्यांना अनुभवायला मिळाले. मनोहर जोशी यांच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सहभागी आहे, असे त्यांनी म्हटले.
एकनाथ खडसे यांची परिस्थिती घरकी ना घाटकी
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत अनिल पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांची परिस्थिती घरकी ना घाटकी अशी झाली आहे. भाजपात कोणी घेत नाही त्यामुळे जावं तरी कुठे जावं, अशी एकनाथ खडसेंची परिस्थिती आहे. दिशाहीन नेतृत्व कुठले असेल तर ते एकनाथ खडसे यांचे आहे. खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेली इच्छा ही पारिवारिक मानसन्मान आहे. एकनाथ खडसे सासरे असल्याने त्यांचा मान ठेवणं हे रक्षा खडसे यांचे कर्तव्य आहे. मात्र खडसेंनी पुन्हा भाजप यावं असा एकही कार्यकर्ता बोललेला नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा