(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजितदादांची राष्ट्रवादी विधानसभेत किती जागा लढवणार? अनिल पाटलांनी थेट आकडेवारीच सांगितली!
Anil Patil : राज्यात महायुतीच्या विजयात भाजप, शिवसेना यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही सिंहाचा वाटा आहे, असे अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
जळगाव : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोठी मुसंडी मारली. राज्यात महायुतीत भाजपला 9, शिवसेना शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली. अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीत केवळ चार जागा लढवल्या. त्यापैकी एकच जागा अजित पवार गटाला जिंकता आली. तर लोकसभा निवडणुकीत 293 जागा जिंकत बहुमत मिळवणाऱ्या एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. नरेंद्र मोदी (Narendra) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला (NCP Ajit Pawar Camp) स्थान मिळाले नाही. यावरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आले असता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील (Anil Patil) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) राष्ट्रवादी अजित पवार गटाला राज्यात ८० जागांची मिळाव्यात अशी मागणी केली आहे.
अनिल पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभेच्या ८० जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी-अधिक काय असेल तो निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले.
किमान ८० जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत
लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकात काय भूमिका राहील या प्रश्नावर बोलताना अनिल पाटील म्हणाले की, महायुतीमध्ये असताना किंवा नसताना हा विचार करण्याची आवश्यकता नाही. जे निकष ठरले आहेत. त्यानुसार छगन भुजबळांनी ९० जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली असली, तरी किमान ८० जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.
उत्तर महाराष्ट्रातून आठ जागांची मागणी
विधानसभेसाठी शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे आणि त्यासाठी आतापासूनच कामाला लागले पाहिजे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 4 जागा, नंदुरबार 2, धुळे 2 याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात आठ जागांची आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा सिंहाचा वाटा
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुती उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले. म्हणून उत्तर महाराष्ट्रात आठपैकी दोन जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. या विजयात भाजप, शिवसेना यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही सिंहाचा वाटा आहे, असेही मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा