Irrfan Khan : "इरफानच्या निधनानंतर 45 दिवस स्वत:ला कोंडून घेतलेलं एका खोलीत"; वडिलांच्या निधनानंतर मुलाची 'अशी' झालेली अवस्था
Babil Khan : इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच बाबिल खानने स्वत:ला दीड महिना एका खोलीत कोंडून घेतलं होतं.
Babil Khan Talks About Irrfan Khan : इरफान खान (Irrfan Khan) बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच बाबिलने (Babil Khan) मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बाबिलने वडिलांच्या निधनानंतरचा एक किस्सा शेअर केला आहे.
बाबिल म्हणाला,"वडिलांच्या निधनाने मला खूप मोठा धक्का बसला होता. आपले वडील आता या जगात नाहीत या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. दरम्यान मी तब्बल 45 दिवस स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतलं होतं. माझं आणि बाबाचं नातं एका मित्रासारखं होतं. त्यामुळे मी एक चांगला मित्र गमावला आहे".
View this post on Instagram
बाबिल खान पुढे म्हणाला,"बाबा शूटिंगमध्ये खूप व्यस्त असायचा. अनेक दिवस तो शूटिंगसाठी घराबाहेर असायचा. त्यामुळे त्याच्या निधनानंतर तो कधीही न संपणाऱ्या शूटसाठी गेला आहे अशी मी मनाची समजूत घातली. त्याच्या निधनाने मी माझा खूप जवळचा मित्र गमावला आहे".
चतुरस्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब चर्चेत आलं. त्यातही इरफान यांचा मुलगा बाबिलकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या. इरफान गेल्यानंतर बाबिल काय पोस्ट करतो.. तो घरी कसा राहतो याकडे अनेकांचं लक्ष होतं. बाबिलनेही त्यानंतर काही काळ आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणींना उजळा दिला होता. त्यांच्यासोबतचे किस्से, त्यांच्यासोबतचे फोटो तो पोस्ट करत असे. आता बाबिल पुन्हा चर्चेत आला कारण, त्याच्याकडे काही चित्रपट आले आहेत. नेटफ्लिक्सचा 'काला' हा त्यापैकी एक चित्रपट आहे. तर दुसरा चित्रपट नुकताच शुजित सिरकार यांनी जाहीर केला आहे.
इरफान खान यांचा 'अपनों से बेवफाई' सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित
इरफानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफान यांचा 'अपनों से बेवफाई' (Apno Se Bewafai) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इरफान खान यांनी अचानक जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे अनेक सिनेमे अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत. अशातच त्यांनी शूटिंग पूर्ण केलेल्या एका सिनेमासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. इरफान खान यांचा 'अपनों से बेवफाई' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या