मिरजमधील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा खून, गाव बंदची हाक
देशभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या, त्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूरसह सर्वच ठिकाणी वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.

सांगली : गणेश विसर्जन (Ganesh immersion) मिरवणुकीत भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना मिरज (Sangli) तालुक्यातील अंकली गावात घडली होती. हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. शीतल धनपाल पाटील (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिरज तालुक्यातील अंकली येथे गणेश विसर्जन मिरवणुक सुरू असताना दोन गटात भांडण झाले होते. यावेळी शीतल धनपाल पाटील हा भांडण सोडवण्यास गेला असताना त्याला हल्लेखोरांनी चाकूने भोसकले. दुर्दैवाने या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शीतलचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) आता गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
देशभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या, त्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूरसह सर्वच ठिकाणी वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. यंदा प्रथमच काही ठिकाणी डिजेमुक्त मिरवणुकांची संकल्पना राबविण्यात आली. त्यामुळे, पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे विसर्जन पार पडले. मात्र, सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे भांडणं सोडविण्यासाठी हा युवक गेला असता, त्याच्यावरच चाकूने हल्ला करण्यात आला आहे.
भांडण सोडवताना शीतल या तरुणास चाकुने भोकसल्याने तात्काळ उपचारासाठी त्यास हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले मात्र त्याचा उपचार सुरू असताना सोमवारी रात्री सिव्हील रुग्णालयामध्ये त्याचा मृत्यू झाला. शितलचे पार्थिव आज सकाळी अंकली गावात नेण्यात आले. यावेळी अंकली गावातील ग्रामस्थ संतप्त झाले होते. शीतलची अंत्ययात्रा आज सकाळी गावातून नेत असताना मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून खुनाच्या घटनेचा निषेध केलाय. या घटनेत सांगली ग्रामीण पोलिसांनी विकास बंडू घळगे (३५), क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (२८), आदित्य शंकर घळगे (२२, रा. अंकली) या तिघाना अटक केली आहे. तसेच, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
























