Pune Police Ayush Komkar: पुणे पोलीस आता आंदेकर गँगचं कंबरडं मोडणार, सगळीकडून समूळ नायनाट करणार, नेमकं काय झालं?
Pune Police Ayush Komkar: अवघ्या 19 वर्षांच्या आयुष कोमकर याच्या शरीरात 9 गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. बंडू आंदेकरने स्वत:च्या नातवालाच ठार मारलं.

Pune Police Ayush Komkar: पुण्यातील नाना पेठ परिसरात 5 सप्टेंबरला आयुष कोमकर या 19 वर्षांच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. टोळीयुद्धातून झालेल्या या हत्याप्रकरणामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. वर्षभरापूर्वी पुण्यात वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. याच हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने (Andekar Gang) आयुष कोमकरला गोळ्या घातल्या. आयुष कोमकर (Ayush Komkar Murder Case) याच्यावर सोमवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यसंस्कारासाठी आयुषचे वडील आणि वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder) हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याला पॅरोलवर सोडण्यात आले होते. तसेच काल रात्री पुणे गुन्हे शाखेने समृद्धी महामार्गावर बंडू आंदेकरसह (Bandu Andekar) सहा जणांना अटक केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याप्रकरणातील काही बाबी उजेडात आणल्या.
अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत आयुष कोमकर हत्याप्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये यश पाटील, अमन पठाण, अमित पाटोळे सुरज मेरगुळ यांचा समावेश आहे. यश पाटील आणि अमन पठाण या दोघांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या. तर अमित पाटोळे आणि सुरज मेरगुळ या दोघांनी शस्त्र पुरवणे आणि परिसराची रेकी करण्याचे काम केले. आयुष कोमकरच्या घराच्या परिसराची टेहळणी करणे, ही या दोघांची मुख्य जबाबदारी होती. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी निलंजय वाडेकर यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोमनाथ गायकवाड हे आंदेकर टोळीचे मुख्य लक्ष्य होते. अजूनही या हत्याप्रकरणातील पाच आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान, पोलिसांनी आंदेकर टोळीच्या सर्व हितचिंतकांना इशारा दिला आहे. सोशल मीडियावर आंदेकर गँगसंदर्भात कोणी रिल अपलोड केले असतील तर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. तसेच आंदेकर टोळीविरोधात कोणालाही काही तक्रार द्यायची असल्यास त्यांनी पोलिसांकडे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आणखी वाचा
























