'अनेक पुरावे दिले, आता काय हवयं?' ; बजरंग पुनियाचा दिल्ली पोलिसांना थेट सवाल
Wrestler Protest: कुस्तीपटूंकडे दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधातले पुरावे देण्यास सांगितले. त्यानंतर बजरंग पुनियाने आता काय हवं असं म्हणत दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारला आहे.
Wrestler Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात महिला कु्स्तीपटूंना पुरावे सादर करण्यावर बजरंग पुनियाने सवाल उपस्थित केला आहे. 'अनेक पुरावे दिले, आता आणखी काय हवं,' असं म्हणत बजरंग पुनियाने थेट दिल्ली पोलिसांना सवाल केला आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांवर कुस्तीपटू ठाम आहेत. त्यानंतर आता बजरंग पुनियाने बृजभूषण सिंह यांच्यावर थंड गतीने होणाऱ्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे. एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बजरंग पुनियाने म्हटलं की, 'बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आम्ही अनेक पुरावे दिले आहेत, आता पोलिसांना आणखी काय हवं आहे?'
दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंकडे बृजभूषण सिंह यांच्याविरोधात या प्रकरणामध्ये आता दोन महिला कुस्तीपटूंना पुरावे सादर करण्यास सांगितले आहेत. पुरावे म्हणून या कुस्तीपटूंना फोटो, ऑडिओ आणि व्हिडीओ सादर करण्यास पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे त्यांच्या आरोपांना पुराव्यांचा दाखला मिळू शकतो. असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आलेला आहे. या महिला कुस्तीपटूंच्या कुटुंबियांना देखील बृजभूषण सिंह यांनी केलेल्या धमक्यांच्या कॉल्सचे रेकॉर्डिंग देखील पुरावे म्हणून देण्यास सांगितले आहे. यावेळी कुस्तीपटूंनी आधीच पुरावे सादर केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता कुस्तीपटू पुरावे सादर करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कुस्तीपटूंचा शेतकऱ्यांना पाठिंबा
कुस्तीपटू बजरंग पुनिया कुरुक्षेत्रमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यास पोहचला आहे. सध्या हरियाणामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बजरंग पुनियाने म्हटलं की, 'मी सरकारला विनंती करतो की, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे वाजवी मूल्य नक्की मिळायला हवे. बजरंग पुनियाने यावेळी बृजभूषण सिंह यांच्या प्रश्नाबरोबर लखमीपुरमधील शेतकरी आत्महत्येचा प्रश्न देखील उपस्थित केला. तसेच केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांच्याविरोधात अजून कारवाई का नाही झाली असा सवाल देखील केला. आम्ही देखील बृजभूषणच्या विरोधात लढत आहोत, त्यामुळे आम्ही सर्व खेळाडू तुमच्या सोबत आहोत. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्ही तुमच्या वेदना समजू शकतो. आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे.' अनेक शेतकरी मोर्चा, खाप पंचायत यांनी देखील कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता खेळाडूंनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.