Wrestlers Protest : दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंकडे मागितले पुरावे; प्रकरणाला आता कोणतं नवं वळण येणार?
Wrestlers Protest : बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या दोन महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी काही पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Sigh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी (Wrestlers) लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी आता दोन महिला कुस्तीपटूंना पुरावे सादर करण्यास सांगितले आहेत. पुरावे म्हणून या कुस्तीपटूंना फोटो, ऑडिओ आणि व्हिडीओ सादर करण्यास पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे त्यांच्या आरोपांना पुराव्यांचा दाखला मिळू शकतो. असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आलेला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पोलिसांनी कुस्तीपटूंना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी जवळ घेतल्याचे फोटो देखील पुरावे म्हणून सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये आधी दोन महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी नवी दिल्लीमधील कनॉट प्लेस पोलीस स्थानाकात बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाची औपचारिक तक्रार नोंदवली होती.
'आम्ही पुरावे सादर केले आहेत'
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 जून रोजी सीआरपीसीच्या कलम 91 अंतर्गत महिला कुस्तीपटूंना स्वतंत्र नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी एक दिवस देखील देण्यात आला होता. तसेच या अहवलात एका कुस्तीपटूंकडून असा देखील दावा करण्यात आला आहे की, आमच्याकडून पुरावे सादर करण्यात आले आहेत.
याशिवाय पोलिसांनी एका कुस्तीपटू आणि तिच्या कुटुंबियांना वेगवेगळी नोटीस बजावून बृजभूषण सिंह यांनी केलेल्या धमक्यांच्या कॉल्सचे रेकॉर्डिंग देखील मागितले आहेत. विशेष करुन कुटुंबियांना करण्यात आलेल्या धमक्यांच्या कॉल्स संबंधी ओडीओ आणि व्हिडीओ, तसेच व्हाट्सअॅप चॅट यांसारखे पुरावे देण्यास सांगितले आहे.
तर, 'कुस्तीपटूंनी शनिवारी बृजभूषण सिंह हे आपल्या शक्तीचा वापर करुन पीडित महिला कुस्तीपटूंवर दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत' असा आरोप केला आहे. तसेच जर 15 जूनपर्यंत बृजभूषण सिंह यांच्यावर काही कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा इशारा कुस्तीपटूंनी दिला आहे. क्रिडामंत्री अनुराग ठाकुर यांच्याशी चर्चा झल्यानंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन स्थगित केलं आहे. परंतु बृजभूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी सातत्याने कुस्तीपटूंकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.