(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सचिन वाझे यांचा खरा ऑपरेटर कोण? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
सचिन वाझे यांचे शिवसेनेसोबत घनिष्ठ संबंध आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेच येताच कोरोनाच्या बहाण्याने सचिन वाझे यांना सेवेत घेण्यात आलं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
नवी दिल्ली : मुंबई पोलीस आयुक्तांची तर बदली केली. पण, सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, असं वक्तव विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच 2018 मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यास शिवसेनेचा दबाव होता. परंतु हायकोर्टाच्या आदेशामुळे निलंबित असलेल्या वाझेंना पुन्हा घेण्यास मी नकार दिला, असा दावाही त्यांनी केला. राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्यानंतर सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचीही उचलबांगडी झाली. त्यानंतर देवेंद फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे यांच्यावरुन सरकारवर निशाणा साधला. तसंच मनसुख हिरण प्रकरणाचा तपासही एनआयएने आपल्याकडे घ्यावा अशी मागणी केली.
हे पोलीस दलाचं अपयश नाही तर सरकारचं अपयश आहे. पोलीस आयुक्तांची तर बदली केली. पण, सचिन वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी फडणवीस म्हणाले की, पोलिसांच्या माध्यमातून एखादी गाडी ठेवली जाते. मनसुख हिरण यांची हत्या केली जाते, अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही घडल्या नाहीत. मूळ प्रश्न आहे तो एपीआय सचिन वाझे यांना नोकरीत का घेतले गेले?
तेव्हा सचिन वाझेंना घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता : फडणवीस
"2018 मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यास शिवसेनेचा दबाव होता. पण, महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन त्यांना सेवेत घेण्यास मी नकार दिला. सचिन वाझे हे शिवसेनेत होते, प्रवक्ते होते. शिवसेनेतील अनेक नेत्यांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. हायकोर्टाच्या आदेशाद्वारे निलंबित असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेच येताच कोरोनाचे कारण दाखवून सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतलं. अनेक लहान आरोप असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांना सेवेत परत घेतलं नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
पोलीस दलात घेतल्यानंतर थेट सीआययूमध्ये नियुक्ती
"सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेताना थेट क्राईम इंटिलिजन्स युनिटमध्ये नियुक्ती दिली. सचिन वाझे यांना सीआययू प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून ठेवण्यात आलं. मुंबईत डान्सबार चालवण्यासाठी खुली सूट आणि सार्यांचे प्रमुख सचिन वाझे होते," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मनसुख हिरण यांची हत्याच झाली : फडणवीस
"मनसुख हिरण यांनी गाडी चोरीला गेल्याची जी माहिती दिली,तेव्हा त्यांची तक्रार प्रारंभी घेण्यात येत नव्हती. पण, तिथेही सचिन वाझे यांनी संबंधित पोलीस ठाण्याला फोन करुन तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. सलग तीन दिवस मनसुख यांची सुद्धा सचिन वाझे यांनीच केली. त्यानंतर त्यांच्याकडून एक तक्रार सुद्धा लिहून घेतली," असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
"मनसुख हिरण यांची हत्या झाली, असं आमचं म्हणणं आहे. या हत्या प्रकरणात एटीएसकडून ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित तशी होताना दिसून येत नाही. एटीएस आणि एनआयए यांच्याकडे अशा काही टेप्स आहेत, ज्यात वाझे आणि मनसुख यांचे संभाषण आहे," असं ते म्हणाले. "पोलीस दलाच्या बाहेरील माझ्यासारख्या व्यक्तीला एवढे पुरावे मिळत असतील तर एटीएसला नक्कीच मिळाले असतील. मनसुख हिरण प्रकरण स्फोटकं प्रकरणाशी संबंधित असल्याने हा तपास एनआएकडे जावा," अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.