FAStag नेमकं काय आहे? त्याने काय सुविधा मिळते?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे.
मुंबई : देशातील सर्व टोलनाक्यांवर आजपासून FASTag अनिवार्य करण्यात आलं आहे. FASTag नसल्यास वाहन चालकांना दुप्पत टोल भरावा लागणार आहे. मात्र हे FASTag नेमकं आहे तरी काय? ते कसं काम करतं? ते कुठे मिळतं? असे अनेक प्रश्न अनेकांना आहेत. तर फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर आहे. हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा होते.
रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याचीही गरज लागत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वेळ वाचतो, इंधनाची बचत होते आणि टोल प्लाझावर होणारी ट्रॅफिक जॅमची कटकटही कमी होण्यास मदत होईल.
FASTag कुठे उपलब्ध होईल?
जर आपण अद्याप आपल्या वाहनावर FASTag स्टिकर लावले नसेल तर तुम्हाला ते लवकरच लावले पाहिजे. पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून FASTag खरेदी केलं जाऊ शकतं. तसेच, देशातील 23 बँकांच्या माध्यमातून FASTag उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही FASTag ची विक्री केली जाते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) त्यांच्या उपकंपनी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) च्या माध्यमातूनही FASTag ची विक्री करते. तुमच्या जवळचं फास्टॅग केंद्र शोधण्यासाठी अॅण्ड्रॉईड फोनवर My FASTag App डाऊनलोड करता येईल. यासाठी ही http://www.fastag.org/apply-online वेबसाईटही तयार करण्यात आली असून इथे जाऊनही तुम्ही फास्टॅग अर्ज करू शकता. अधिक माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या 1033 या हेल्पलाईनवर फोन करता येईल.
FASTag मध्ये मिनिमम बलेन्स ठेवण्याची गरज नाही
...तर दुप्पट टोल भरावा लागणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. एनएचएआयने यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. नंतर ते दीड महिना वाढवण्यात आले. मात्र आता FASTag च्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकललं जाणार नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट केलं.
Nitin Gadkari on FASTag | फास्टॅगसाठी 15 फेब्रुवारी शेवटची तारीख : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी