Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा आज शपथविधी, सौरव गांगुलींसोबत 'या' मान्यवरांना आमंत्रण
तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. आज सकाळी 10 वाजून 45 मिनीटांनी ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास सज्ज झाल्या आहेत. त्या आज सकाळी 10 वाजून 45 मिनीटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणाऱ्या ममता बॅनर्जींच्या शपथविधीला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही ठराविक लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे.
देशात आणि राज्यात असलेले कोरोनाचे संकट लक्षात घेता आजचा शपथविधीचा कार्यक्रम हा छोट्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 55 मिनीटांचा असेल. त्या आधी ममता बॅनर्जी या काली घाट या ठिकाणच्या आपल्या निवास स्थानावरून 10 वाजून 25 मिनीटांनी रवाना होतील. त्यांच्या सोबत त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर उपस्थित असतील.
सूत्रांच्या मते, आज पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, तृणमूलचे महासचिव पार्थ चटर्जी, ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जी, राज्याचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त डाव्या पक्षाचे नेते विमान बोस, बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष, भाजप नेते मनोज टिग्गा, काँग्रेस नेते अब्दुल मन्नान, प्रदिप भट्टाचार्य, काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे असं सांगण्यात येतंय.
शपथविधीनंतर ममता बॅनर्जी या थेट नबन्ना साठी रवाना होतील. त्या ठिकाणी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 292 पैकी 213 जागांवर विजय प्राप्त केला आहे आणि सलग तिसऱ्यांदा सत्ता पटकावली आहे. भाजपला 77 जागांवर समाधान मानावं लागलं असून इतर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. महत्वाचं म्हणजे डाव्या आणि काँग्रेसच्या आघाडीला राज्यात एकही जागा मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या: