गेल्या 22 दिवसांपासून पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस, संजय राऊतांचा टोला
काही क्षण सोडले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत दिसले नाहीत. आम्हालाही पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.
नवी दिल्ली : गेल्या 22 दिवसांपासून आम्हालाही पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस असून, त्यासाठी आम्हीही पराकाष्टा करत असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काही क्षण सोडले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत दिसले नाहीत. त्यांनाही काही अडचणी असतील. कारण ते सध्या उत्तर प्रदेश प्रचारात सध्या दंग असल्याचा टोला देखील राऊतांनी पंतप्रधानांना लगावला.
कास विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता. चहापानाला मुख्यमंत्री आले नाहीत, याची चिंता विरोधकांनी करू नये असेही राऊत म्हणाले. अधिवेशनापूर्वी काल सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. गरज पडली तर मुख्यमंत्रीही विधान भवनात येतील असे राऊत यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या विधानावर
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. तुमच्या सल्ल्याची गरज नाही, कारण, तुमच्या सल्ल्यावर सरकार चालत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. सल्ले देण्याऐवजी विरोधी पक्षाचं काम चोख बजावा असे राऊत यांनी सांगितले. केंद्र सरकार किती नियमान चालतं हे अख्ख्या देशाला माहिती आहे. व्यवस्थेबद्दल मोदी सरकारने खूप केले आहे, त्याची यादी वाचायला लावू नका असा टोलाही राऊतांनी पाटील यांना लगावला. केंद्र सरकारच्या सुचनेनुसारच कार्यवाही केली पाहिजे, त्यामुळे अधिवेशन कालावधी कमी आहे. जेवढं हवे तेवढे अधिवेशन होणार आहे. विरोधकांना गोंधळ घालायचा आहे म्हणून तसे दिवस देता येणार नाहीत. कामाचे दिवस सरकारने ठरवले असल्याचे राऊत म्हणाले.
भाजपच्या कार्यालयातूनच ईडीची सूत्रे हलत आहेत
भाजपच्या कार्यालयातूनच ईडीची सूत्रे हलत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे आमच्या लोकांना त्रास होणार हे आम्ही गृहीत धरले आहे. उत्तर प्रदेशमध्ये बदल होईल असे दिसत आहे, त्याचमुळे पंतप्रधानांनी आठ दिवस तिथं डेरा टाकला आहे. पण पश्चिम बंगालमध्येसुद्धा कितीही ताकद लावली तरी फटका बसतोच असेही राऊत यावेळी म्हणाले. 2024 ला सुद्धा केंद्रात बदल होईल, असं वातावरण दिसत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.