(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India china : 'अरुणाचलमधील 'ते' गाव 1959 पासूनच चीनच्या ताब्यात'
अमेरिकेच्या संरक्षण खात्याने अमेरिकन संसदेला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, चीनने भारत-चीनमधील वादग्रस्त भागात भारताच्या हद्दीत 100 घरे असलेले गाव वसवले असल्याचे अहवालात म्हटले.
नवी दिल्ली: अमेरिकेच्या पेंटागॉनने अरुणाचल प्रदेशच्या हद्दीत चीनने गाव वसवले असल्याचा खुलासा एका अहवालात केला होता. या अहवालानंतर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या अहवालात चीनने वसवलेले गाव 1959 मध्येच वसवले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. संरक्षण खात्याशी निगडीत सूत्रांच्या माहितीनुसार, पेंटागॉनच्या अहवालात चीनने 100 नागरी घरे वसवले असल्याचा दावा करण्यात आला. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने हे गाव 1959 मध्ये ताब्यात घेतले होते. या भागाची जबाबदारी आसाम रायफल्सकडे होती. ही लष्करी मोहीम लोंगजू प्रकरण म्हणून ओळखली जाते.
चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील गावात चीनने गाव वसवले असल्याचे पेंटागॉनने म्हटले. सूत्रांच्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून चीनने या भागात लष्करी पोस्ट तयार केली आहे. चीनने केलेले बांधकाम हे काही दिवसांमध्ये झालेले नाही. या बांधकामासाठी काही वर्षांचा कालावधी गेला असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
अमेरिकेच्या संरक्षण खात्याने अमेरिकन संसदेला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, चीनने भारत-चीनमधील वादग्रस्त भागात भारताच्या हद्दीत 100 घरे असलेले गाव वसवले असल्याचे अहवालात म्हटले होते. या अहवालामुळे खळबळ माजली होती.
गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीन या दोन्ही देशांत सीमेवर शांतता राखण्यासाठी चर्चा सुरु आहे. पण या चर्चेतून सीमेवरील तणाव कमी झाला नसल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. एकीकडे भारतासोबत चर्चा सुरु ठेवायची आणि दुसरीकडे सीमेवर सैन्यबळ वाढवायचं असा डाव चीनचा असल्याचं उघड झालं आहे.
भारताच्या भूमीवर म्हणजे अरुणाचल प्रदेशवर चीन सुरुवातीपासूनच हक्क सांगतोय. भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या या भागातल्या दौऱ्याला चीनचा कायम विरोध असतो. पेंटॅगॉनने 'मिलिट्री अॅन्ड सिक्युरिटी डेव्हलपमेन्ट इन्व्हॉल्विंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या शिर्षकाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात चीनच्या लष्करी हालचालींबाबत नमूद करण्यात आले.