Onam 2023 : केरळात ओनम सणाचा उत्साह, तिरुओनमनिमित्त 26 पदार्थांची मेजवानी
Onam 2023 : केरळमध्ये सध्या ओनम सणाचा उत्साह असून आज या सणाचा दुसरा दिवस आहे. हा दिवस तिरुओनम म्हणून ओळखला जातो.
केरळ : केरळसह (Kerla) संपूर्ण देशात ओनम (Onam) हा सण आनंदाने साजरा केला जातो. हा सण एकूण दहा दिवस साजरा केला जातो. नववर्षाचं (New Year) स्वागत करण्यासाठी केरळ राज्यात ओनम हा सण साजरा करतात. या सणाचे शेवटचे चार दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामधील तिरुओनम या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यानिमित्त केरळच्या पारंपारिक 26 पदार्थांची मेजवानी केली जाते. अगदी उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला जातो.
तिरुओनमचं महत्त्व
ओनम हा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यातच तिरुओनमला केरळमध्ये विशेष महत्त्व आहे. तिरुओनमच्या दिवशी पारंपारिक जेवणाचा बेत केला जातो. केळीच्या पानावर आणि काही ठिकाणी तर अगदी जुन्या पद्धतीने जेवणाचा बेत केला जातो. अनेक ठिकाणी तर जमिनीवर बसून अगदी पारंपारिक पद्धतीने जेवणाचा आस्वाद घेतला जातो. त्यासाठी अत्यंत साधेपणाने सगळ्या गोष्टी केल्या जातात. ओनम सण हा दक्षिण भारतातील केरळ राज्यात प्रामुख्याने साजरा केला जाणार सण आहे. दहा दिवस या सणाचा उत्साह असतो. ज्यामधील चार दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात.
26 पदार्थांची मेजवानी
तिरुओनमच्या दिवशी 26 पदार्थांची मेजवानी केली जाते. यामध्ये केळ्याचे वेफर्स, पापड, विविध भाज्या, गोड आणि आंबट दोन्ही प्रकारचे लोणचे, पारंपारिक अवियाळ, सांबार, वरण, तूप, रसम, ताक, नारळाची चटणी आणि पायसम या पारंपारिक पदार्थांचा समावेश असतो. तसेच हे सर्व पदार्थ केळीच्या पानावर खाल्ले जातात. तिरुओनमला या प्रत्येक पदार्थाला विशेष महत्त्व असते. तसेच संपूर्ण दिवसाची कामं बाजूला ठेवून केरळमध्ये या मेजवानीचा बेत घरोघरी केला जातो.
हल्ली धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक पंरपरा या पाळणं बऱ्याचदा कठीण होतं. पण केरळमध्ये तिरुओनमच्या दिवशी या 26 पदार्थांची मेजवानी करणं हा नियम अगदी कटाक्षाने पाळला जातो. पण आजकाल स्वयंपाकघरामध्ये या पदार्थांची मेजवानी करणं हे कठीण होतं. त्यामुळे चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन लोक या पदार्थांचा आस्वाद घेतात. सर्वसाधारणपणे 300 रुपये ते 1500 रुपयांपर्यंत या पदार्थांची किंमत असते. त्यामुळे लोक या गोष्टीला प्रधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
केरळमध्ये नवं वर्ष साजरं करताना ओनम हा सण साजरा केला जातो. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी ओनमच्या दिवशी केरळमध्ये अगदी उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यामध्ये या सणाचा उत्साह आहे. घरोघरी रांगोळ्या काढून, सजावट करुन नववर्षाचं स्वागत अगदी आनंदाने केलं जातं. यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील ठिकठिकाणी केले जाते. तसेच ओनम हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.