K. Kavitha : महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था ही शेपटीसारखीच, प्रादेशिक पक्ष देशाचं नेतृत्व करतील, आमदार के कविता यांची टीका
तेलंगणा राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था ही शेपटीसारखीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
K. Kavitha : महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था ही शेपटीसारखीच असल्याचे वक्तव्य तेलंगणा राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता यांनी केलं आहे. उद्या देशातही काँग्रेस टेल पार्टी असेल आणि प्रादेशिक पक्ष देशाचं नेतृत्व करतील असेही त्या म्हणाल्या. प्रादेशिक पक्षांकडे लोकांसाठी ध्येय धोरणे आहेत, अजेंडा आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेस शिवसेना या प्रादेशिक पक्षामुळेच सत्तेत असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी के. कविता यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा लगावला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली. आपला देश बेरोजगारी आणि जातीयवादाशी झगडत आहे. प्रादेशिक पक्षांच्या यशाबद्दल राहुल गांघी यांनी दुःख व्यक्त केले. आम्ही यशस्वी होतो कारण आम्ही कामगिरी करतो. आमच्याकडे काँग्रेससारखे नेतृत्व संकट नसल्याचेही कविता म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी उदयपूर येथील काँग्रेस चिंतन शिबिरात दावा केला होता की, कोणताही प्रादेशिक पक्ष भाजपला पराभूत करु शकत नाही. कारण त्यांच्याकडे विचारधारा नाही. ही लढाई फक्त काँग्रेसच लढू शकते, असे राहुल म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर प्रादेशिक पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर ते प्रादेशिक पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत. दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनेही राहुल गांधींच्या वक्त्व्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. टीएमसीने आपल्या मुखपत्र 'जागो बांगला' च्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की लोक आता विश्वास ठेवत नाहीत की काँग्रेस हा भाजपचा खरा विरोधक आहे. विरोधी चेहरा आता ममता बॅनर्जी आहे हे लोकांना त्यांच्या अनुभवावरुन कळले आहे. भाजपलाही हे समजले असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर प्रादेशिक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधींचे हे बालिक वक्तव्य असल्याचे प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेस देशाच्या राजकारणासाठी किती घातक आहे, हे चिंतन शिबिराच्या निष्कर्षावरुनच दिसून येत असल्याचे समाजवादी पार्टीने म्हटले आहे. तर आरजेडीचे पर्शन रामबली सिंह म्हणाले, की भाजप सध्याच्या काळात खूप मजबूत आहे. प्रादेशिक पक्षाच्या सहकार्याशिवाय काँग्रेस पक्ष त्यांना पराभूत करण्यासाठी काहीही करु शकत नसल्याचे रपर्शन सिंह म्हणाले. तर जेडीयूचे प्रवक्ते अभिषेक झा यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केली होती.