...तोपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नाही; भावनाविवश चंद्राबाबू यांची चाणक्यप्रतिज्ञा
Chandrababu Naidu : तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भीष्म प्रतिज्ञा केली आहे.
अमरावती: तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. जोपर्यंत सत्तेत परतणार नाही, तोपर्यंत आंध्र प्रदेशच्या विधानसभेत पाऊल ठेवणार नसल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी चंद्राबाबू भावूक झाले होते. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या आमदारांकडून सुरू असलेल्या सततच्या टीका, निंदानालस्तीमुळे आपण व्यथित झालो असल्याचे विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत म्हटले.
मागील दोन-अडीच वर्षांपासून माझा सातत्याने अपमान केला जात आहे. मात्र, त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र, आज माझ्या पत्नीवर टीका करण्यात आली. मी कायम सन्मानाने जगलो आहे. मात्र, आता होणारी टीका, निंदानालस्ती सहन करू शकत नसल्याचे चंद्राबाबू यांनी म्हटले. चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेलाही संबोधित केले. त्यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री रेड्डी यांनी सातत्याने विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य केले असून त्यांचा अपमान कसा होईल यासाठी प्रयत्न केला असल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला.
विधानसभा अध्यक्ष तम्मीनेनी सीताराम यांनी चंद्राबाबू नायडू विधानसभेत बोलत असताना त्यांचा माइक बंद केला. या दरम्यान सत्ताधारी बाकांवरून चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होती. चंद्राबाबू नायडू नाटक करत असल्याचे सत्ताधारी वायएसआर आमदारांनी म्हटले.
कृषी क्षेत्राबाबत आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.
या गोंधळानंतर चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या चेंबरमध्ये आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत चंद्राबाबू भावूक झाले होते. चंद्राबाबू भावूक झाल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे आमदार स्तब्ध झाले होते. या बैठकीतच नायडू यांनी आपला पक्ष सत्तेवर जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नसल्याचे म्हटले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha