सकारात्मक बातमी! ऑक्सफोर्डमध्ये कोरोना संसर्गावरील लसीवर यशस्वी संशोधन
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखाच्या पार गेली आहे. अजुनही संख्या वाढण्याची भीती आहे. पण, या भीतीच्या वातावरणात दिलासा देणारी बातमी येतेय थेट ऑक्सफोर्डमधुन. ऑक्सफोर्डमध्ये कोरोना चाचणी यशस्वी होताना दिसत आहे.
नवी दिल्ली : कोविड-19 च्या लसीच्या प्राथमिक टप्प्यात मानवी चाचण्यांनंतर प्राणघातक कोरोनाव्हायरसपासून "दुहेरी संरक्षण" मिळण्याची शक्यता आहे. तसे परिणाम चाचण्यांतून दिसून आले आहेत. हे निष्कर्ष सोमवारी जाहीर केले जातील, असा अंदाज आहे. तरीही त्याबद्दलची माहिती मात्र प्रसारमाध्यमात आलेली आहे.
यूकेच्या स्वयंसेवकांच्या गटाकडून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांमधून ही लस शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) आणि “किलर टी-सेल्स” तयार करण्यास मदत करते. या चाचणीतील एका ज्येष्ठ सदस्याने ‘द डेली टेलीग्राफ’ला ही माहिती दिली आहे.
हजारोंच्या संख्येत चाचण्या सुरु ऑक्सफोर्डच्या संशोधनाबाबत आणखी एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की या लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा यापुर्वीच सुरु झालाय. इंग्लंडबरोबरच आफ्रिका तसंच दक्षिण अमेरिकेत या लसीच्या हजारोंच्या संख्येत चाचण्या सुरु झाल्यात. ही चाचणीही यशस्वी झाल्यास लवकरात लवकर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटापर्यंत ही लस लोकांपर्यंत पोहोचण्याचा सकारात्मक अंदाज या लसीशी संबंधित शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.
भारतातील औषध कंपन्या संपूर्ण जगासाठी कोरोना लसीची उत्पादन करण्यास सक्षम : बिल गेट्स
भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं महत्त्वाचं भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं फार महत्त्वाचं आहे. कारण या लसीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने कोट्यवधींची गुंतवणूक केलीय. सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे या लसीचे कोट्यवधी डोस तयार आहेत. त्यांनीही या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी घेतलीय. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे. ते यशस्वी झाल्यास कोरोनावर खऱ्या अर्थाने उत्तर सापडलेलं असेल.
भारतातही लवकरचं लस उपलब्ध येण्याची शक्यता
हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड Bharat Biotech International Limited या औषध कंपनीने आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च संस्था तसंच पुण्यातील एनआयव्ही म्हणजे राष्ट्रीय विषाणु विज्ञान संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस बनवली आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच या लसीच्या परवानगी देताना आयसीएमआरने 15 ऑगस्टपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्याचं आवाहन भारत बायोटेक कंपनीला केलं आहे. हे पत्र सोशल मीडियात खूप व्हायरल झालं होतं. जेमतेम दीड महिन्यात लस बनवणं शक्य आहे का? मानवी चाचण्यांच्या सर्व टप्प्यांच्या संशोधनासाठी हा कालावधी अपूर्ण आहे, अशा चर्चाही मोठ्या प्रमाणात झाल्या.
COVID 19 वरील संभाव्य सीओव्हीआयडी -19 लसच्या प्रारंभिक चाचण्या | डॉक्टर महेश कात्रे यांच्याशी बातचीत