Solar Eclipse 2021: यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आज; केवळ लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत दिसणार
Solar Eclipse 2021: 2021 मधील पहिलं सूर्यग्रहण आज आहे. हे पहिलं सूर्यग्रहण, अरुणाचल प्रदेश आणि लडाख वगळता भारतातील इतर भागांत दिसणार नाही. तर याव्यतिरिक्त उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील काही भागांत सूर्यग्रहण दिसणार आहे.
Surya Grahan 2021 : यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 10 जून 2021, गुरुवारी दुपारनंतर 1 वाजून 42 मिनिटांनी सुरु होणार आहे. जे संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. हिंदु पंचांगानुसार, हे सूर्यग्रहण ज्येष्ठ महिन्यातील आमावस्या वृषभ रास आणि मृग नक्षत्रात लागणार आहे. तब्बल 148 वर्षांनी सूर्यग्रहण आणि शनि जयंती एकाच दिवशी येण्याचा योग आला आहे.
नेमकं कशामुळं होतं ग्रहण?
शास्त्रज्ञांच्या मते, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला की, सूर्यग्रहण घडते. त्यामुळे सूर्याचा संपूर्ण प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते, असं शास्त्रज्ञ सांगतात.
भारतातील या राज्यांत दिसणार सूर्यग्रहण
हे सूर्यग्रहण भारताच्या दोन राज्यांत दिसणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या केवळ काही भागांत हे सूर्यग्रहण दिसणार आहे. या भागांत हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या काही वेळ आधी दिसणार आहे.
2021 मधील हे पहिलं सूर्यग्रहण, अरुणाचल प्रदेशमध्ये दिबांग वन्यजीव अभयारण्याजवळ संध्याकाळी जवळपास 5 वाजून 52 मिनिटांनी दिसणार आहे. तर लडाखच्या उत्तरेकडील भागांत हे संध्याकाळी 6 वाजता दिसणार आहे. येथे सूर्यास्त संध्याकाळी जवळपास 06 वाजून 15 मिनिटांनी होईल.
या देशांमध्ये दिसणार सूर्यग्रहण 2021
2021मधील पहिलं सूर्यग्रहण मुख्यतः उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील काही भागांत दिसणार आहे.
सूर्यग्रहण पाहताना ही काळजी नक्की घ्या
सूर्यग्रहण पाहताना उघड्या डोळ्यांनी कधी पाहू नये. नासाच्या मते हे दुर्मिळ सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोलर फिल्टर ग्लासयुक्त चश्मे घाला. एक्स-रे शीट किंवा साधारण चश्मा घालून हे ग्रहण पाहू नका. यामुळं आपल्या डोळ्यांना नुकसान होऊ शकतं. ग्रहणादरम्यान ड्रायव्हिंग किंवा रायडिंग करु नये. लहान बाळांनी सूर्यग्रहण पाहू नये.