(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संजय राऊत आणि बृजभूषण सिंह यांची आज शरयूकाठी भेट होणार!
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांची आज संध्याकाळी सात वाजता भेट होणार आहे. जभूषण सिंह हे तेच खासदार आहेत, ज्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या तीव्र विरोध केला होता.
अयोध्या : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांची आज भेट होणार आहे. शरयू नदीकाठी आज संध्याकाळी सात वाजता दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. बृजभूषण सिंह हे तेच खासदार आहेत, ज्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या तीव्र विरोध केला होता. उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधीच खासदार संजय राऊत देखील अयोध्येत पोहोचले आहेत. आज संध्याकाळी बृजभूषण सिंह यांची शरयूकिनारी भेट होईल.
शरयूच्या काठी काल (13 जून) संजय राऊत पाहणी करत असताना बृजभूषण सिंह देखील तिथे उपस्थित होते. परंतु काल त्यांनी भेट घेणं टाळलं होतं. परंतु आज दोन्ही नेत्यांच्या भेटीची वेळ ठरली आहे. आज संध्याकाळी शरयूची महाआरती होईल, तेव्हा तिथे त्यांची भेट होईल. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होणार याची उत्सुकता आहे.
राज ठाकरेंना विरोध, ठाकरे कुटुंबाला नाही : बृजभूषण सिंह
दरम्यान माझा विरोध राज ठाकरे यांना आहे, ठाकरे कुटुंबाला नाही. त्यामुळे राज यांच्या आई, पत्नी किंवा कुटुंबातील कोणीही अयोध्येत आलं तर मी स्वत: त्यांचं आदरातिथ्य करेन. परंतु राज ठाकरे यांना माझा विरोध कायम आहे. माफी मागत नाही तोपर्यंत राज ठाकरेंना विरोध कायम राहिल, असं बृजभूषण यांनी म्हटलं होतं.