Puri Shankaracharya : मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदूच; शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांचा दावा
Odisha News : शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांच्याबाबत दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की, मंदिर आणि देवस्थानांवर सरकारचं नियंत्रण नको.
Shankaracharya Swami Nischalananda : शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी दावा केला आहे की, मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते. त्यांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये विपक्ष सदस्यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला आहे. मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) आणि येशू ख्रिस्त (Jesus Christ) यांचे पूर्वज सनातनी हिंदू (Sanatani Hindu) असल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा स्वामी निश्चलानंद यांनी केला आहे. त्यांनी भुवनेश्वरमध्ये मंगळवारी 31 जानेवारी रोजी एका कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केलं आहे.
'मंदिरे आणि मठांवर सरकारचे नियंत्रण नसावे'
पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी म्हटले आहे की, मंदिरे आणि मठांवर सरकारचे नियंत्रण नसावे आणि प्रत्येक ठिकाणी विकासकामांसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. पुरीच्या रत्न भंडाराच्या हरवलेल्या चावीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ओदिशा सरकार आणि जगन्नाथ मंदिर प्रशासनाने मंदिरासंदर्भात कोणत्याही मुद्द्यावर कधीही चर्चा केली नाही. रत्न भंडारच्या प्रकरणामध्ये मी हस्तक्षेप का करू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
38 वर्षांपूर्वी हरवली रत्नभंडारची चावी
पुरी येथील जगन्नाथ मंदिरात एकूण सात रत्नभंडार आहेत. यापैकी एक कायम खुला असतो. सुमारे 38 वर्षांपूर्वी चार भंडारांच्या चाव्या अचानक गायब झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडे फक्त दोन भंडारांची चावी होती. याआधी स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी जोशीमठमधील घरांना भेगा पडणे, निसर्गाचा आदर करणे आणि विकासाला चालना देणे या विषयावर भाष्य केलं. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले होते की, संतुलन राखण्याची गरज आहे.
'पृथ्वी आणि पर्यावरण शुद्ध ठेवणे आपले काम'
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये (Joshimth) मागील काही दिवसांपासून घर, इमारती आणि रस्त्यांना भेगा पडण्याचे सत्र सुरू आहे. जोशीमठमधील जमीन खचत आहे. यावर स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे की, पृथ्वी आणि पर्यावरण शुद्ध ठेवणे आपले काम आहे. 'विकास' हा शब्द त्याच्या योग्य संदर्भात समजून घेतला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विकास करण्याची गरज नाही. पृथ्वी, पाणी आणि हवा हे उर्जेचे स्रोत आहेत.
बागेश्वर महाराजांनाही दिलं समर्थन
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी काही दिवसांपूर्वी बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनाही समर्थन दिलं होतं. अंनिसच्या श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळला. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्री काहीही चुकीचे करत नसल्याचे स्वामी निश्चलानंद यांनी म्हटलं आहे. त्यांच्यामुळे अनेक लोक सनातन धर्मात राहिले आहेत. धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांना आश्वासन दिले नसते तर यातील अनेकांनी आतापर्यंत ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला असता, असंही त्यांनी म्हटलं आहे.