Walmik Karad: 'कडक कपडे घालून शानमध्ये येणार, वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
Jitendra Awhad On Walmik Karad: वाल्मिक कराड आज शरण येणार असल्याचे बोलले जात आहे.
Jitendra Awhad On Walmik Karad: बीड येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे. याचदरम्यान बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना 29 डिसेंबरच्या रात्रीच पुण्यातून सीआयडीने अटक केल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाहीय, असं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता अचानक पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवल्याने चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीपसींग गील आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे दाखल झाले आहेत. वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यास त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन पुणे पोलीसांकडून सीआयडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं बोललं जात आहे. वाल्मिक कराड आज शरण येणार असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 'एक्स'वर (आधीचे ट्विटर) पोस्ट केली आहे.
आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल- जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये. कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता. तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावायला सुरूवात केली जाईल. मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती....अजूनही त्याला 302 चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार याचे उत्तर मिळालेले नाही. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 31, 2024
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी-
1. जयराम चाटे (हत्या प्रकरण)
2. महेश केदार (हत्या प्रकरण)
3. प्रतीक घुले (हत्या प्रकरण)
4. विष्णू चाटे (हत्या प्रकरण) (खंडणी प्रकरण)
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी-
5. सुदर्शन घुले (हत्या प्रकरण) (खंडणी प्रकरण)
6. कृष्णा आंधळे (हत्या प्रकरण)
7. सुधीर सांगळे (हत्या प्रकरण)
8. वाल्मिक कराड (खंडणी प्रकरण)
संबंधित बातमी:
Suresh Dhas Prajakta Mali: सुरेश धस यांची दिलगिरी, वादावर पडदा टाकला; प्राजक्ता माळीची भूमिका काय?