Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे.
Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात असून वाल्मिक कराड सध्या फरार आहे. त्यातच वाल्मिक कराडला दोन अंगरक्षक देण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत (Navneet Kanwat) यांनी भाष्य केलंय.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची सोमवारी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली. यानंतर कांवत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यात जेवढे शस्त्राचे लायसन्स आहेत, त्या सर्व लायसन्सचे अवलोकन सध्या सुरु आहे. कायद्यानुसार शस्त्र परवान्यांची गरज आहे की नाही याचे विश्लेषण सुरु आहे. ज्या लोकांना गरज नाही त्यांचे शस्त्र परवाने रद्द होणार आहेत. शस्त्र परवाना देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असतो. आम्ही प्रत्येक फाईलचे विश्लेषण करणार आहोत. बीड पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतील. कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले.
वाल्मिक कराडसोबत पोलीस?
वाल्मिक कराडला दोन अंगरक्षक देण्यात आले होते. ते कोण आहेत. अंगरक्षक कधी काढून घेतले, यासंदर्भात पोलीस प्रशासनाचे सर्क्युलर आहे का? याबाबत विचारले असता याबाबत मला माहिती घ्यावी लागेल. मी माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अंजली दमानियांच्या दाव्यावर पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया
अंजली दमानिया यांनी तुम्हाला एक व्हॉइस मेसेज पाठवला होता. ज्यात तीन लोकांची हत्या बसवा कल्याणमध्ये झाली, असा उल्लेख होता. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी मला जी माहिती दिली त्याची आम्ही सखोल चौकशी केली आहे. एका माणसाने दारू पिऊन अंजली दमानिया यांना मेसेज केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...