मोठी बातमी : वाल्मिक कराड पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!
Pune CID: वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात दाखल असलेले तिन्ही गुण्याचा तपास सीआयडी करत आहे, त्यामुळे तो सीआयडी कडे समर्पण करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
पुणे: बीड येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे. याचदरम्यान बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना 29 डिसेंबरच्या रात्रीच पुण्यातून सीआयडीने अटक केल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाहीय, असं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आता अचानक पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवल्याने चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार आहेत. ते सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी चर्चा होती. मात्र, अद्याप वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले नाहीत. मात्र, आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेरील हालचालींना वेग आल्याने वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर आता पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक पोलीसांची मदत मुख्यालयासमोर बंदोबस्तासाठी घेण्यात आली आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असला तरी केज पोलीस ठाण्यात दाखल असलेले तिन्ही गुण्याचा तपास सीआयडी करत आहे, त्यामुळे तो सीआयडी कडे समर्पण करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराड यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात दिसून आले होते. वाल्मिक कराड हे उज्जैन येथील महाकाल मंदिर आणि मध्य प्रदेशातील पेच अभायारण्यात काही काळ मुक्कामाला असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र, आता वाल्मिक कराड पोलिसांना शरण येतात का, हे पाहावे लागेल. सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीपसींग गील आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे दाखल. वाल्मीक कराड सी आय डी ला शरण आल्यास त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन पुणे पोलीसांकडून सी आय डी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
वाल्मिक कराड शरण जाण्याबाबत जितेंद्र आव्हाडांची सूचक पोस्ट
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सोशल मिडियावरून एक पोस्ट लिहली आहे, त्यामध्ये त्यांनी वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे, अशी माहिती दिली आहे.
काय लिहलंय पोस्टमध्ये?
आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या काॅलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये. कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता. तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावायला सुरूवात केली जाईल. मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती. अजूनही त्याला 302 चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार याचे उत्तर मिळालेले नाही. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही.
आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 31, 2024