Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
Pune New Year Celebration : पहाटे पाचपर्यंत रेस्टॉरंट, बार सुरू ठेवण्यास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, मद्यविक्री करण्यासाठी रात्री एक वाजेपर्यंतचे बंधन घालण्यात आलं आहे.
पुणे: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट रूम पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून, दारूच्या दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्रीची मुभा दिलेली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्रेमींना रात्री उशिरापर्यंत पार्टी करता येणार आहे. पुणे शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्रेमींना रात्री एकपर्यंत मद्य खरेदी करता येणार आहे, रात्रभर पार्टी करण्यासाठी हॉटेल सुरू राहणार आहेत. पहाटे पाचपर्यंत रेस्टॉरंट, बार सुरू ठेवण्यास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, मद्यविक्री करण्यासाठी रात्री एक वाजेपर्यंतचे बंधन घालण्यात आलं आहे.
या ठिकाणी दिसेल न्यू इयर पार्टीचा उत्साह
डेक्कन परिसर, कोरेगाव पार्क, जंगली महाराज रस्ता, कॅम्प, विमाननगर, हिंजवडी, बाणेर, बावधन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, खराडी, विमाननगर, कोथरूड, औंध आदी. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, पबमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील पवनानगर, पानशेत, भूगाव, मुळशी, लोणावळा आदी ठिकाणच्या हॉटेल्स, रिसॉर्टमध्येही विविध कार्यक्रमांनी नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. गड- किल्ल्यांसह जिल्ह्यातील धार्मिक स्थळेही पर्यटकांनी गजबजल्याचं दिसून येत आहे. धार्मिक स्थळी देखील मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन बुकिंग करण्यात आलेलं आहे.
मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट तुरूंगवास
नववर्षाचे स्वागत करताना मद्यपान करून वाहन चालवू नका. कारण पुणे शहरांतील चौकांमध्ये अशा वाहन चालकांवर पुणे पोलिस विशेष मोहिमेद्वारे कारवाई करणार आहेत. शहर आणि उपनगरांतील प्रमुख चौक, रस्त्यांवर 'ब्रेथ अॅनालायझर'द्वारे वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच नववर्षाचा जल्लोष करताना कसला त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. नववर्षाचे स्वागत करताना अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात तीन हजार 500 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
पोलिसांचे नियोजन
शहरातील बार, पबवर राज्य उत्पादनशुल्क विभागाचे कडक लक्ष ठेवणार आहेत.
25 वर्षांच्या आतील युवकांना मद्य विक्रीस बंदी आहे.
राज्य उत्पादनशुल्क विभाग 21 भरारी पथकांद्वारे शहरात लक्ष ठेवणार आहेत.
मद्यविक्रीस मध्यरात्री 1 वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट रूम पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी
नागरिकांना त्रास होत असल्यास नजीकच्या पोलिस ठाण्यात किंवा पोलिस नियंत्रण कक्षात (100 किंवा 111) संपर्क साधावा
23 हून अधिक चौकांत वाहनचालकांच्या तपासणीसाठी पोलिसांची पथके असणार आहेत.
मद्यपान करून वाहन चालवताना चालक आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
जंगली महाराज, फर्ग्युसन आणि महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतुकीत सायंकाळी 5 नंतर बदल करण्यात येणार आहे.
आपत्कालीन वाहनांना प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.