भाजप सोडून काँग्रेसचा हात धरलेल्या माजी खासदार सावित्रीबाई फुले स्वत:चा पक्ष स्थापन करणार
नव्या वर्षात जानेवारीत लखनौमध्ये सावित्रीबाई फुले नव्या पक्षाची घोषणा करु शकतात. सावित्रीबाई फुले खासदार असताना अनेकदा त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडून काँग्रेसचा हात धरलेल्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेसलाही रामराम ठोकला आहे. काँग्रेस सोडून त्या आता स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याच बोललं जात आहे. सावित्रीबाई फुले या उत्तर प्रदेशच्या बहराईचच्या माजी खासदार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपवर उघड नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भाजपमध्ये वरिष्ठ नेते आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच भाजप समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्यांमुळे भाजपची अनेकदी कोंडी झाली होती. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसमध्येही त्या फार रमल्या नाहीत. आता काँग्रेस सोडतांनाही त्यांनी पक्षावर तेच आरोप केला आहे. काँग्रेसमध्येही आपलं ऐकून घेतलं जात नाही, असं सावित्रीबाई फुले यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वर्षात जानेवारीत लखनौमध्ये सावित्रीबाई फुले नव्या पक्षाची घोषणा करु शकतात. सावित्रीबाई फुले खासदार असताना अनेकदा त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाजपसोबत मतभेद उघड मांडले होते. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या इलाहाबादचं नाव प्रयागराज करण्याच्या निर्णयालाही त्यांनी विरोध केला होता. तसेच अयोध्येत बुद्ध विहार निर्माण करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
लोकसभेत अनुसूचित जाती, बहुजन समाज, आदिवासी समाज यांच्यावर ज्यावेळी चर्चा होते, तेव्हा आम्हाला बोलण्याची संधी दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे बहुजन समाजाचे खासदार आपली संपूर्ण बाजू मांडू शकत नाहीत, असं त्यांचं म्हणणं होतं.
भाजपमध्ये या सर्व गोष्टींमुळे त्यांची घुसमट होत होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्यांनी काँग्रेसही सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:चा नवीन पक्ष काढणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे बहुजन समाज त्यांच्या नव्या पक्षावर विश्वास दाखवणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.