Pulwama Attack : पुलवामातल्या त्रुटींबद्दल राजकीय फायद्यासाठी दुर्लक्ष? माजी राज्यपालांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
Satya Pal Malik : पुलवामा घटनेचं सगळं खापर पाकिस्तानवर फोडण्याचा आणि त्यातून राजकीय फायदा घ्यायचा हेतू पंतप्रधानांचा होता असा आरोप माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलाय.
नवी दिल्ली: देशाच्या पंतप्रधानांवर थेट आरोप करणारी माजी राज्यपालांची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. पुलवामा घटनेबद्दल काही गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी द वायरच्या मुलाखतीत केले आहेत. या घटनेवरुन आता विरोधकांनीही वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुलवामाबद्दल चूप राहायला सांगितलं, जम्मू काश्मीरच्या अनेक गोष्टी तर त्यांच्या गावीच नाहीत तसेच भ्रष्टाचाराबद्दल त्यांना काही अगदीच तिटकार आहे असं नाही असे आरोप माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहेत.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी द वायर या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही मोठी वक्तव्यं केली आहेत. सगळ्यात मोठा आरोप आहे पुलवामाबद्दलचा.
पुलवामातल्या सुरक्षा त्रुटींकडे राजकीय फायद्यासाठी दुर्लक्ष?
पुलवामावेळी सीरपीएफनं संख्या अधिक असल्यानं जवानांच्या वाहतुकीसाठी विमानाची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली होती. राजनाथ सिंह हे त्यावेळी गृहमंत्री होते. ही मागणी मान्य झाली नाही. घटनेनंतर आपण याबाबत पंतप्रधानांना फोन करुन सुरक्षेतल्या त्रुटींबाबत कळवलं असं माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं म्हणणं आहे. पण पंतप्रधानांनी तूर्तास याबाबत मौन धारण करायला सांगितलं. दोभाल माझे वर्गमित्र होते, त्यांनाही कळवलं. पण त्यांनीही असंच सांगितलं. त्यामुळे मला लक्षात आलं की सगळं खापर पाकिस्तानवर फोडण्याचा आणि त्यातून राजकीय फायदा घ्यायचा हेतू दिसतोय असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केलाय.
मलिक हे त्यावेळी काश्मीरचे राज्यपाल होते. कलम 370 हटवलं गेलं त्याही वेळी ते काश्मीरचे राज्यपाल होते. पण काश्मीरबद्दलच्या अनेक गोष्टी पंतप्रधानांच्या गावीच नसल्याचा दावा त्यांनी केला. सोबत भ्रष्टाचाराबद्दल मोदींना काही अगदीच तिटकारा नाही असंही आपण खात्रीनं सांगू शकतो असंही मलिक या मुलाखतीत म्हणाले आहेत.
साहजिकच सत्यपाल मलिक यांच्या या विधानानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय.
देशात सध्या स्थिती आहे की बोलण्याची हिंमत खूप कमी लोक करतायत. त्यात मोदींच्याच कार्यकाळात राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक ही हिंमत का करतायत हाही प्रश्न आहेच. त्यासाठी त्यांची पार्श्वभूमीही बघितली पाहिजे.
सत्यपाल मलिक हे वेस्टर्न यूपी या साखर पट्यातले, जाट समुदायातून येतात. समाजावादी नेते लोहिया यांच्याकडून प्रेरणा घेत ते राजकारणात आले. पण नंतर अनेक पक्ष त्यांनी बदलले. भारतीय क्रांती दल, लोकदल, मग नंतर काँग्रेस. बोफोर्सच्या वादानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. जनमोर्चा बनवला. जनता दलाच्या तिकीटावर ते निवडून आले. मग 2002 पासून ते भाजपसोबत आहेत.
2017 ते 2022 या काळात सत्यपाल मलिक हे चार राज्यांचे राज्यपाल होते. बिहार, गोवा, मेघालय आणि काश्मीर. गोव्यातही भाजप सरकारच्याच भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी थेट विधानं केली होती आणि त्यांच्या वादांची मालिका याआधीही पाहायला मिळालीय.
सत्यपाल मलिक आणि वाद
शेतकरी आंदोलनाचं राज्यपाल पदावर असतानाही जाहीर समर्थन, मोदी सरकारवर जाहीर टीका.
एका मुलाखतीत शेतकरी आंदोलनाबद्दल मोदी उर्मठ असल्याची टीका केली होती. 500 शेतकऱ्यांचा जीव गेल असं आपण त्यांना सांगितल्यानंतर ते माझ्यासाठी गेले का असं मोदी म्हणाल्याचा दावा मलिक यांनी केला होता.
काश्मीरमध्ये राज्यपाल असताना एका डीलबाबत मंजुरीसाठी संघाचे राम माधव यांनी दबाव आणल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्याविरोधात मानहानीची नोटीस दाखल करणार असल्याचंही राम माधव यांनी जाहीर केलं आहे.
सत्यपाल मलिक हे आता राज्यपाल नाहीत. भाजपमध्ये असूनही मोदींविरोधात बोलणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी नंतर दुसऱ्या पक्षांचा मार्ग स्वीकारला. आता सत्यपाल मलिकही त्याच वाटेवर आहेत का याचीही चर्चा रंगतेय.
पुलवामाच्या आधी आणि पुलवामानंतर, लोकसभा निवडणूक तोंडावर असताना घडलेल्या या घटनेनं चित्र बदलून टाकलं होतं. आता पुढची लोकसभा निवडणुक जवळ आली असताना सत्यपाल मलिक यांनी याबाबतचे आरोप केले आहेत. त्याला भाजप कसं तोंड देतं आणि या वादातून विरोधकांच्या हाती खरंच काही गवसतं का याची उत्सुकता असेल.