एक्स्प्लोर
दिग्विजय सिंह दहशतवादी, साध्वी प्रज्ञा यांचं पुन्हा वादग्रस्त विधान
मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी दहशतवादी म्हटले आहे. साध्वी म्हणाल्या की, "दहशतवाद संपवण्यासाठी एका साध्वीला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले आहे." भोपाळ मतदार संघातील सीहोर येथे भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रज्ञा ठाकूर बोलत होत्या.
साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, "राज्यात 16 वर्षांपूर्वी उमा दिदी (उमा भारती) यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे 16 वर्षापर्यंत ते मान वर करु शकले नाहीत. आता त्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा एका साध्वीसोबत सामना होणार आहे. हा त्यांच्या कर्माचा परिणाम आहे."
VIDEO | तरुणाच्या अनपेक्षित उत्तरानं दिग्वजिय सिंहांचा तिळपापड! | भोपाळ | एबीपी माझा
गेल्या काही दिवसांपासून साध्वी प्रज्ञा सातत्याने वादग्रस्त विधानं करत आहेत. चार दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी बाबरी मशीदीबाबत वादग्रस्त विधान केले होते. प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या होत्या की, "मी बाबरी मशीद पाडायला गेले होते, आम्ही मिळून मशीदीचा ढाचा पाडला आणि आता मंदिर बांधायलादेखील जाणार आहोत."
त्याआधी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरेंबाबतही एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. साध्वी म्हणाल्या होत्या की, "हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला." याप्रकरणी साध्वींना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती."
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























