Republic Day 2021: दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला अखेर पोलिसांची परवानगी
शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता, मात्र त्याऐवजी दिल्लीतल्या अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली आहे. प्रजासत्ताक दिनाला राजपथावर सैन्याची परेड तर दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पाहायला मिळणार आहे. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाजीपुर बॉर्डर व शहाजापूर बॉर्डर येथून ट्रॅक्टर्स दिल्लीमध्ये येणार आहेत. शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता, मात्र त्याऐवजी दिल्लीतल्या अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. सर्व सीमांवरचे ट्रॅक्टर एकत्रित येणार नाहीत तर जिथपर्यंत परवानगी दिली आहे तिथून ते आपापल्या ठिकाणी परत माघारी जाणार आहेत.
शेतकरी दिल्लीत येतील आणि शांततेत मोर्चा काढतील, असं शेतकरी नेते म्हणाले. उद्या परेडचा मार्ग अंतिम होईल. शनिवारी शेतकरी नेते व पोलिस यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव म्हणाले की, 26 जानेवारी रोजी शेतकरी या देशात प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेड करणार आहे. पाच टप्प्यांच्या चर्चेनंतर या सर्व गोष्टींना मंजुरी देण्यात आली आहे. सर्व बॅरिकेड्स उघडतील, दिल्लीत जाऊन आम्ही परेड काढणार आहे. रुट कोणता असेल याबाबत जवळपास सहमती झाली आहे.
26 जानेवारी रोजी ऐतिहासिक परेड होईल, असं शेतकरी नेते म्हणाले. देशाची आन-बान-शान यावर कोणताही फरक पडणार नाही. परेड मार्गावर काही बदल होतील ते उद्यापर्यंत अंतिम होईल. शेतकऱ्यांनी सांगितले की पोलिसांना बॅरिकेट्स तोडण्याचा इशारा दिला होता पण पोलिसांनीच ते काढण्यास स्वतः मान्य केलं आहे. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. दिल्ली पोलिसांना आणि केंद्र सरकारलाही एक पाऊल मागे जावं लागलं आहे.
संपूर्ण जग दिल्लीतील शेतकरी परेड उद्या पाहणार आहे. या दरम्यान शांतता राखण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केलं आहे. परेडची वेळ अद्याप अंतिम नाही. या परेडची वेळ निश्चित झाली नाही मात्र, परेड 24 तास ते 72 तास चालू शकते. योगेंद्र यादव म्हणाले, आम्ही 26 जानेवारीला आपल्या अंतःकरणाची भावना व्यक्त करण्यासाठी राजधानीत जाणार आहोत. ही अशी ऐतिहासिक शेतकरी परेड असेल जी याधी कधीच झाली नसेल.